पुण्यात 26 मेपासून 14 दिवस जमावबंदी; आंदोलन-मोर्चांवर बंदी, इंधन बचतीसाठी मनपाचे कठोर आदेश

सार्वजनिक शांतता, आणि संवेदनशील भागांमधील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Untitled Design 95 1

Untitled Design 95 1

14-day curfew in Pune from May 26 : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात राज्यभरात वातावरण तापलेले असतानाच पुणे शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विविध राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक गटांकडून आंदोलनांची हाक दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. पुणे शहरात 26 मे 2026 मंगळवार रात्रीपासून पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, मिरवणुका, धरणे किंवा सार्वजनिक सभा घेण्यास पूर्णपणे बंदी असणार आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37 (1), (2) आणि (3) अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील सार्वजनिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि संवेदनशील भागांमधील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आगामी बकरी ईद तसेच इतर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे.

या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणे, घोषणाबाजी करणे, मोर्चे काढणे किंवा मिरवणुका आयोजित करणे यावर कडक बंदी असेल. तसेच कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असणार असून, परवानगीशिवाय जमाव जमवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईडचा स्फोट; 4 जण जखमी

पोलिसांनी शस्त्रे आणि घातक वस्तूंवरही कठोर निर्बंध लागू केले आहेत. तलवार, भाला, लाठी, काठी, बंदूक किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करू शकणारी वस्तू सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय दगड साठवणे, शस्त्रासारख्या वस्तू तयार करणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ जवळ ठेवणे तसेच ज्वलनशील द्रव्यांची वाहतूक करणे यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक शांतता भंग होईल अशा घोषणा देणे, चिथावणीखोर भाषण करणे, आक्षेपार्ह गाणी किंवा वाद्यांचा वापर करणे यावरही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही नेत्याच्या, राजकीय व्यक्तीच्या किंवा सामाजिक घटकाच्या प्रतिमेचे, पोस्टरचे किंवा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. तसेच शिष्टाचाराच्या विरोधात असलेले फलक, पोस्टर्स किंवा चिन्हे वापरणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर भडकाऊ संदेश प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे. शहरात संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारेही परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंधन दरवाढीविरोधात विविध संघटना आंदोलनाच्या तयारीत असताना प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे पुढील काही दिवस पुणे शहरात तणावपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version