5 MPs from Maharashtra awarded Sansad Ratna : यंदाच्या संसद रत्न पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. संसदेतील उल्लेखनीय कामगिरी, अभ्यासपूर्ण भाषणं, विविध विषयांवरील प्रभावी मांडणी आणि सक्रिय उपस्थितीच्या जोरावर महाराष्ट्रातील तब्बल पाच खासदारांची संसद रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशभरातून निवड झालेल्या 12 खासदारांपैकी पाच खासदार महाराष्ट्रातील असल्याने राज्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या संसद रत्न पुरस्कार 2026 च्या यादीमध्ये लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ आणि पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचाही समावेश असून स्मिता वाघ आणि डॉ. मेधा कुलकर्णी यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
यावर्षी देशभरातून 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पाच पुरस्कार मिळाल्याने राज्याचा संसदीय कामगिरीतील दबदबा पुन्हा अधोरेखित झाला आहे. संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करताना सांगितले की, वैयक्तिक श्रेणीत उत्तर प्रदेशचे जगदंबिका पाल, राजस्थानचे पी. पी. चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे आणि महाराष्ट्राचे डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच इतर निवडलेल्या खासदारांमध्ये उत्तर प्रदेशचे प्रवीण पटेल, झारखंडचे विद्युत बरन महतो, राजस्थानचे लुंबाराम चौधरी, महाराष्ट्राचे नरेश गणपत म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, स्मिता उदय वाघ आणि डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांचा समावेश आहे. 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत संसदेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे या खासदारांची विविध श्रेणींमध्ये निवड करण्यात आली आहे, असेही प्रियदर्शनी राहुल यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी पत्रकार राजदीप सरदेसाई यांची माफी का मागितली होती?
दरम्यान, उत्कृष्ट कामगिरीबद्दल चार संसदीय स्थायी समित्यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात डॉ. चरणजित सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या नेतृत्वाखालील वित्त समिती, सप्तगिरी शंकर उलाका यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण विकास आणि पंचायतराज समिती तसेच अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील कोळसा आणि खाण समितीचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये काही दिग्गज राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशचे जगदंबिका पाल आणि पंजाबचे डॉ. चरणजित सिंग चन्नी हे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत, तर गुजरातचे नरहरी अमीन हे माजी उपमुख्यमंत्री होते. संसद रत्न पुरस्काराची स्थापना 2010 साली चेन्नईस्थित प्राइम पॉइंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार केली होती. विशेष म्हणजे, या पुरस्कार सोहळ्याचे पहिले उद्घाटन स्वतः डॉ. कलाम यांच्या हस्ते करण्यात आले होते.
प्राइम पॉइंट फाउंडेशनचे संस्थापक आणि संसद रत्न पुरस्कारांचे प्रणेते श्रीनिवासन यांनी सांगितले की, प्राइम पॉइंट फाउंडेशनने नुकताच आपला 25 वा वर्धापन दिन साजरा केला आहे. ज्येष्ठ संसद सदस्य, निवृत्त घटनात्मक अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेली प्रतिष्ठित ज्युरी विजेत्यांची निवड करते. खासदार आणि संसदीय समित्यांच्या कामगिरीची आकडेवारी पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांकडून घेतली जाते.
मागील 15 पुरस्कार सोहळ्यांमध्ये खासदार आणि समित्यांना एकूण 143 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. प्रत्येक पुरस्कार विजेत्याने स्वतः उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला आहे. यंदाचा 16 वा संसद रत्न पुरस्कार सोहळा जुलै 2026 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडणार असून, त्यावेळी 150 वा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
