Download App

लाखो तरुणांना रोजगार मिळणार, दावोसमध्ये आत्तापर्यंत 88 हजार 420 कोटींचे करार

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत आज दुपारपर्यंत विविध उद्योगांशी 42 हजार 520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आतापर्यंत सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे.

तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.15 हजारांच्या रोजगाराचा प्रकल्प अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे 20 हजार कोटी रुपयांचा असणार आहे. तर कोल गॅसीफिकेशन प्रकल्प रोजगार 15 हजार, ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे 1 हजार 520 कोटींचा स्टील प्रकल्प रोजगार 2 हजार, इस्त्रायलच्या राजुरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे 600 कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प येणार असल्याची माहिती समोर आलीय.

त्याचप्रमाणे पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे 400 कोटी रुपयांचा प्लास्टिक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प रोजगार 2 हजार तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा 20 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा अॅटो प्रकल्प राज्यात विविध ठिकाणी रोजगार 30 हजार अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत, त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या ठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली, असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us