Jadhavar Group of Institutes : प्राप्त परिस्थितीला पर्याप्त मानावे. जे मला प्राप्त झाले आहे ते पुरेसे आहे, उचित आहे. जे आहे ते खूप आहे, अशी भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होते, तेव्हा जीवनातील उणिवा आपल्याला जाणवत नाहीत. त्यामुळे जीवन जगण्याचा एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. हा आनंद शास्त्रांनी आपल्याला दिलेला अमूल्य वारसा आहे, असे प्रतिपादन वृंदावन धाम, संत शिवाई माता संस्थान श्री क्षेत्र शिऊर येथील भागवताचार्य श्रद्धेय स्वामी पंढरीनाथ महाराज शास्त्री यांनी केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त व अधिक मासाच्या निमित्ताने डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल १ च्या प्रांगणात आठव्या श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. भागवत ग्रंथाच्या भव्य मिरवणुकीने महोत्सवाचा प्रारंभ झाला.
महोत्सवाची सांगता शनिवार, दि. ६ जून रोजी सकाळी ६ ते ८ यावेळेत परिक्षीती उद्धार व समाप्ती तसेच सकाळी १० वाजता शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे काल्याचे कीर्तन याने होईल. त्यानंतर दुपारी १२ ते २ यावेळेत महाप्रसाद होणार आहे. सुरेखा जाधवर, अंजली येप्रे, लक्ष्मीछाया हुले, शीतल तळेकर, लता गांदले, शोभा पाटील, डॉ.महालक्ष्मी मोराळे, विजया जाधवर, सुरेखा गायकवाड, मंजुश्री हुले यांसह ह.भ.प.येप्रे महाराज साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ न-हेगाव यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे.
स्वामी पंढरीनाथ महाराज शास्त्री म्हणाले, शास्त्राचा सिद्धांत असा आहे की, संसारातील विषयांमधून मिळणारे सुख हे मृगजळाप्रमाणे असून त्यातून खरा आनंद मिळत नाही. अनेक दुःखे सहन करूनही मिळणारे सुख क्षणिक असते. माणसाची खरी गरज शाश्वत आणि पूर्ण आनंदाची आहे. तो पूर्ण आनंद म्हणजे भगवंताचे स्वरूप होय. भगवान हे सत्स्वरूप, चित्स्वरूप आणि आनंदस्वरूप असल्याने त्यांना ‘सच्चिदानंद’ म्हटले जाते. संपूर्ण सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय हे सर्व त्यांच्या अनंत सामर्थ्यानेच घडत असते.
लंकेंसह काँग्रेसच्या चव्हाणांची माघार…, तनपुरेंसाठी आघाडीचा छुपा डाव ?
प्रा. डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, आपले संस्कार आणि संस्कृती जिवंत ठेवून पूर्वजांचा वसा पुढील पिढीकडे पोहोचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संस्कार, आचार, विचार आणि ब्रह्मज्ञानाचा वारसा कमी होत चालल्याने समाजाच्या संस्कृतीचे अधःपतन होत आहे. जे खरे ज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान असून आपल्या साधुसंतांनी ते आपल्याला सांगून ठेवलेले आहे. मात्र आज त्यामध्ये काही तथ्य नसल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक आध्यात्मिक ज्ञानाकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर स्क्रोल करण्यात वेळ घालवत आहेत. आजची पिढी सांस्कृतिक मूल्यांपासून दूर जात असल्याने समाजप्रबोधन आणि संस्कार संवर्धनासाठी भागवत कथेचे श्रवण काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
