Download App

सोशल मीडियावर २५ हजारांहून कमी फॉलोअर्स, भाजपाच्या ९७ टक्के आमदारांची तिकीटे धोक्यात; नक्की काय आहे प्रकरण ?

नागपूर : सतत इलेक्शन मोडवर राहणाऱ्या भाजपने आता २०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू केली. या निवडणुकीमध्ये भाजपचे (BJP) मुख्य लक्ष्य सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म राहणार आहे. म्हणजेच, पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंतचे सर्व विद्यमान उमेदवार सोशल मीडिया प्लॅटफार्मवर किती सक्रिय आहेत, यावर त्यांची पुढील उमेदवारी निश्चित होणार असल्याचे सांगितलं जात आहे. या दृष्टीने भाजपने सरपंचापासून आमदारापर्यंत (MLA) सोशल मीडिया ऑडिट सुरू केले.

या ऑडिटनुसार विद्यमान १३ टक्के आमदार सोशल मीडियावर पूर्णपणे निष्क्रिय आहेत, तर ९७ टक्के आमदारांचे फाॅलोअर्स २५ हजारांपेक्षा कमी असल्याने त्यांचे तिकीट धोक्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ९७ टक्के मधील ५०टक्के आमदारांचे फाॅलोअर्स ३ महिन्यांत २५ हजारांच्या वर आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आमदार-खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार १०४ आमदार, २५ खासदारांबरोबर सुमारे २ हजार ८०० लोकप्रतिनिधींचे रिपोर्ट कार्ड पक्षाने तयार केले आहे, १०४ पैकी १३ टक्के आमदार सोशल मीडियावर पूर्ण निष्क्रिय, तर ९७ टक्के आमदारांचे फॉलोअर्स २५ हजारांच्या घरामध्ये असणार आहे.

७० टक्के खासदार सोशल मीडियावर सक्रिय असणार आहेत, २५ हजारांपेक्षा कमी फाॅलोअर्स असलेल्या आमदारांमध्ये ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आमदार आहेत. त्यांची ग्रामीण भागातील लोकांशी नाळ असली तरी सोशल मीडियाच्या विषयी ते किती प्रमाणात मागे आहेत.

सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत

२०२४ च्या निवडणुकीसाठी सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे. बहुतांश चौकीदार आणि पहारेकरी सोशल मीडियावर कायम काहीतरी पाहत असतात. एखाद्याने एका विषयाची पोस्ट बघितली की त्याच प्रकारच्या पोस्ट त्याला येत असतात. या गोष्टीचा आधार भाजप घेत आहे. लोकप्रतिनिधींपासून भाजपच्या सोशल मीडिया हँडलपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जात आहे. याकरिता भाजपचे १९ हजार शुभचिंतक सोशल मीडिया वाॅरियर म्हणून पक्षाशी जोडले जाणार आहेत. त्यांच्या मदतीने हे आव्हान पेलण्याचे उद्दिष्ट राहणार आहे.

अडीच लाख ग्रुप जोडणार

लोकप्रिय सोशल मीडियाचे अडीच लाख ग्रुप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी जोडणार जाणार आहे. ७ मिनिटांत चांदा ते बांद्यापर्यंत मेसेज फॉरवर्ड होणार असल्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आज १८ वर्षांच्या मतदाराने फक्त मोदींचे राज्य बघितलं आहे. काँग्रेसचा सत्ताकाळ त्यांना माहिती नाही. हा वर्ग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने त्यांचा उपयोग करून घेणार आहेत.

२५ हजार फॉलाेअर्सचा नक्की काय आहे प्रकरण ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूरमध्ये (Nagpur) बोलताना तिकीट वाटपाबाबत सोशल मीडियातील फॉलोअर्सच्या शक्तीचा विचार केला जाणार असल्याची माहिती दिले होते. त्यात सरपंचांपासून आमदारांपर्यंत तिकीट वाटपात २५ हजार फॉलोअर्सचा फंडा बाबत त्यांनी सांगितलं होत.

मोदींचे कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी…

देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य घराघरात पोहोचवायचे आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) या ध्येयपूर्तीकरिता खूप मोठ्या प्रमाणात आणि गतीने परिश्रम घेत आहेत. त्यासाठी बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. पुढील ८ महिन्यांत ९५ हजार बूथवरील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती देखील दिली.

Tags

follow us