A 23-year-old youth ended his life by hanging himself : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांना विरोध आणि त्यातून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, विशाल भैरम काळे (वय 23, रा, हुडको कॉलनी, शिरूर, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशालच्या बहिणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चैत्राली चंदू भोसले, रोहित चंदू भोसले, ऋषिकेश चंदू भोसले, कोला काळुराम काळे आणि परशान काळुराम काळे या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
तुळापूर रेव्ह पार्टीवर तेजस्विनी सातपुतेंचा मोठा खुलासा; 100 हून अधिक तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, विशाल आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. कोरेगाव पार्क परिसरातील मुख्य सिग्नलजवळ फुले आणि इतर किरकोळ वस्तू विक्री करण्याचे काम ते करत होते. याच काळात विशालचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाईकांचा विरोध असल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, या प्रेमसंबंधांमुळे विशालला सातत्याने मानसिक त्रास आणि दबावाचा सामना करावा लागत होता. या कथित छळामुळे तो नैराश्यात गेला आणि अखेर त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वणवे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे प्रेमसंबंधांवरील कौटुंबिक विरोध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
