बाप काढायचा अधिकार कुणी दिला?’ अधिवेशनात भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात खडाजंगी

भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात विधानभवनाच्या पोर्चमध्येच बाचाबाची झाल्याची माहिती.

Untitled Design 127

Untitled Design 127

A fight between Bhaskar Jadhav and Sachin Kalyanshetty : मुंबईत सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, विविध राजकीय मुद्द्यांमुळे वातावरण तापलेले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात दोन आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात विधानभवनाच्या पोर्चमध्येच बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमका वाद कशावरून?

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह 15 मार्च रोजी पार पडणार आहे. त्या अनुषंगाने आमदारांच्या खासगी सहाय्यकांकडून विधिमंडळ परिसरात लग्नपत्रिकांचे वाटप सुरू होते. यावरून ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत जहरी टीका केल्याचे सांगितले जाते. विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारे पत्रिका वाटप करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी बोलताना त्यांच्या वक्तव्यात सरकारचा बाप काढला असा उल्लेख झाल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे वातावरण अधिकच तापले.

माझा बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे?

या संदर्भात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जाधवांना थेट जाब विचारल्याचे समजते. तुम्ही बाप काढलाय, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का? तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्ही बाप काढला तर मीही काढेल, अशा शब्दांत त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांनी, तुम्हाला माझा बाप काढायचा असेल तर काढा, असे म्हटल्याचे सांगितले जाते. या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ विधिमंडळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सचिन कल्याणशेट्टी यांची प्रतिक्रिया

या प्रकारानंतर माध्यमांशी बोलताना सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले की, भास्कर जाधव कर्मचारी वर्गावर रागावत होते. मी सभागृहात प्रवेश करत असताना ते सरकारचा बाप काढत होते. अपशब्द माझ्या कानावर पडले. काही हरकत असेल तर तक्रार करा, असे मी त्यांना सांगत होतो. इथे आपण परिवारासारखे राहतो. लग्नपत्रिका एकमेकांना देत असतो. पण कोणाचा किंवा सरकारचा बाप काढणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

तसेच, विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यामुळे ते असे वागत असावेत. मात्र अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण घटनेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधीच तापलेले वातावरण आणखी ढवळून निघाल्याचे चित्र आहे. पुढे या प्रकरणावर अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version