उद्धव ठाकरेंचा खास निरोप घेऊन कैलास पाटील-वरूण सरदेसाईंची ओमराजेंसोबत तासभर चर्चा; आज जाहीर होणार भूमिका

मातोश्रीवरून खास निरोप घेऊन आमदार कैलास पाटील आणि आमदार वरूण सरदेसाई यांनी मध्यरात्री पुण्यात ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली.

Untitled Design 31

Untitled Design 31

A special message from Uddhav Thackeray : पवनराजे निंबाळकर खून प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी “हे कलयुग आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असून, चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’चा फियास्को होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मातोश्रीवरून खास निरोप घेऊन आमदार कैलास पाटील आणि आमदार वरूण सरदेसाई यांनी मध्यरात्री पुण्यात ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली.

मध्यरात्री पुण्यात तासभर खलबतं

पुण्यातील बाणेर येथील ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत जवळपास एक तास चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन दोन्ही नेते ओमराजेंच्या भेटीला पोहोचले होते. बैठकीनंतर बोलताना कैलास पाटील यांनी, ओमराजे निंबाळकर आमच्या पक्षातच राहावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते पुढेही सुरू राहतील, असे सांगितले.

निकालाचा कुटुंबाला धक्का बसला

वरूण सरदेसाई यांनीही बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पवनराजे निंबाळकर खून प्रकरणातील निकाल अपेक्षित नव्हता. पक्ष सचिव म्हणून आम्ही भेटलो. काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली, मात्र त्या सर्व गोष्टी सार्वजनिकपणे सांगणे योग्य नाही. ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. निकालामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रीलस्टार म्हणून हिणवणी, कुटुंबावर टीका आणि पक्षांतराच्या चर्चा; ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

उद्धव ठाकरेंचा निरोप, ओमराजेंनी मागितला एक दिवस

बैठकीनंतर कैलास पाटील यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांचा निरोप ओमराजे निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. त्यावर ओमराजेंनी विचार करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली आहे. त्यामुळे आज मतदारसंघातील कार्यकर्ते आणि शिवसैनिकांशी चर्चा करून ते आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोवर्धनवाडीतील बैठकीकडे राज्याचे लक्ष

आज गोवर्धनवादी येथे ओमराजे निंबाळकर यांनी शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे देखिव बैठकीला उपस्थित राहून ओमराजे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. संभाव्य पाकसानंतरच्या पार्श्वभूमीवर ही बैठक निर्णायक मानाली जात आहे. निष्ठावान शिवसनिनिकांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ओमराजे निंबाळकर नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version