पुणे : तेलंगणा राज्यामध्ये सुरू असलेल्या हिंद केसरी किताबाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजीत कटकेनं बाजी मारलीय. अभिजीतनं हरियाणाच्या सोमवीर याचा 5-0 गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवलाय. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटकेनं यापूर्वी 2017 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. अभिजीतनं जिंकलेला हिंदकेसरी किताब महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवणारी आणि तेवढीच अभिमानाची गोष्ट आहे.
अभिजीतच्या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जातोय. अभिजीत मुळचा पुण्याचा असल्यानं पुण्यात फटाके फोडून जल्लोष साजरा केला जात आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघानं 5 ते 8 जानेवारीदरम्यान हैदराबाद येथे अखिल भारतीय 51 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2023 आयोजित केली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोमवीर विरुद्ध अभिजीत कटके यांचा सामना झाला. त्यामध्ये अभिजीतनं 5-0 ने सोनूवीरचा पराभव करुन हिंद केसरी खिताब आपल्या नावावर केलाय. दोघांच्या लढतीपूर्वी हिंद केसरीची गदा महाराष्ट्रात जाणार की हरियाणात जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं, आता दोघांच्या लढतीनंतर ही गदा महाराष्ट्राकडं आली आहे. या स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानं सर्वांच्या नजरा अभिजीतवरचं होत्या.
महाराष्ट्र केसरी 2017 स्पर्धेत भूगावमध्ये अभिजीतनं किरण भगतचा पराभव करुन महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला होता. अभिजीत दोनदा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. अखिल भारतीय अॅमॅच्युअर रेसलिंग फेडरेशनतर्फे हिंदकेसरी हा खिताब देण्यात येतो. हा खिताब या फेडरेशनकडून आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो. यापूर्वी 2013 मध्ये पुण्याच्या अमोल बराटेनं हा खिताब पटकावला होता.
अभिजीतनं पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेलल्यानंतर सोमवीरला आक्रमणाची संधीच मिळू दिली नाही. दुसऱ्या फेरीत देखील नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सूचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सूचना दिली. मात्र तीस सेकंदात तो अभिजीतचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्यानं पंचांनी अभिजीतला एक गुण दिला. शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला. परंतु, अभिजित त्याला एकही गुण मिळू न देता हिंदकेसरीची गदा पटकावली.