Download App

आमदार गोरेंचा अपघात की घातपात? खासदार नाईक निंबाळकरांनी सांगितला घटनाक्रम

पुणे : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज (ता.२४ डिसेंबर) पहाटे अपघात झाला आहे. यामध्ये आमदार गोरे जखमी झाले असून त्यांचे सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आमदार गोरे यांच्या वडिलांनी अपघात झालेल्या मार्गावर जास्त वाहनांची वर्दळ नसते. यामुळे हा अपघात की घातपात?, अशी शंका व्यक्त केली होती. यामुळे अनेकांकडून याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यामुळे यावर आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून अपघाताचा संपूर्ण घटनाक्रमचं सांगितला आहे.

खासदार नाईक निंबाळकर म्हणाले, अपघात झाल्यानंतर मी सुमारे पाच ते सहा मिनिटात घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा गाडीचा ड्रायव्हर बेशुद्ध अवस्थेत होता. आणि ज्याप्रकारे अपघात घडला आणि ज्याप्रकारे गाडी कठडा तोडून पडलेली दिसली त्यावरून मला यामध्ये घातपात झाला असेल असे वाटत नाही.

आमदार गोरे यांच्या वडिलांना मी बोललो असून त्यांनाही मी हेच सांगितले आहे. ड्रायव्हरला डुलकी (झोप) लागल्यामुळेच हा अपघात झाला असे मला वाटते, असे मत खासदार नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, उद्या ड्रायव्हरचेही याबद्दलचे स्टेटमेंट येईलच. मात्र आज मी खात्रीपूर्वक सांगतो की यामध्ये घातपात नसून हा अपघात फक्त ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला आहे.

दरम्यान, गोरे यांच्या इतर सहकाऱ्यांवर देखील उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर आहे. दोन जणांवर पुण्यात तर दोघांवर बारामती आणि फलटणमध्ये उपचार सुरू आहे,अशी माहिती खासदार नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

Tags

follow us