अन्न व औषध प्रशासनाने (FDA) १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवत भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण ६ कोटी ३३ लाख ७४ हजार १५५ रुपयांचा आणि २ लाख ११ हजार ६१ किलो संशयित व निकृष्ट अन्नसाठा जप्त करण्यात आला. तसेच प्रतिबंधित गुटखा कारवाईत २१ जणांना अटक करण्यात आली.
दूध व दुग्धजन्य पदार्थांवरील कारवाई
सोलापूर जिल्ह्यातील अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज, बुंगेवाडी (ता. सांगोला) येथे परवाना नसताना दूध संकलन व चिलिंग युनिट चालविणे, दुधात पाणी मिसळल्याचा संशय आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळून आले. येथे ३७,४३२ लिटर दूध (₹१५.०९ लाख) जप्त करण्यात आले. त्याच संस्थेच्या वाहनातून २४,४७८ लिटर दूध (₹११.३९ लाख) निकृष्ट असल्याच्या संशयावरून नष्ट करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रियदर्शनी दूध संकलन केंद्र, आंबीलवाडी येथून २४,४७८ लिटर दूध (₹९.१७ लाख) जप्त करून नष्ट करण्यात आले. मेहेकरी येथील संयुक्त मिल्क कलेक्शन सेंटर येथून २१६ लिटर दूध, तर वीरभद्र डेअरी, मेहेकरी येथून १४८ लिटर दूध निकृष्ट असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले.
भिवंडीतील शाह एंटरप्रायझेस येथे विविध ब्रँडच्या स्किम्ड मिल्क पावडर व स्प्रे ड्राईड डेअरी क्रीमरमध्ये चुकीचे लेबलिंग (Misbranding) आढळल्याने २४,६२५ किलो माल (₹१.११ कोटी) जप्त करण्यात आला.
खाद्यतेलावरील मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगरातील बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दोन रिफायनिंग युनिट्सवर छापे टाकून वापरलेले टिन, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया, दूषित तेल, प्रयोगशाळेचा अभाव, COA प्रमाणपत्र नसणे आदी गंभीर त्रुटी आढळल्या. येथे रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल, कापूसबिया तेल आणि वनस्पती तेल मिळून ₹२,२३,३५,६०३ किमतीचा साठा जप्त करण्यात आला. दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील राधेश्याम प्रोटिन्स प्रा. लि. येथे रिफाइंड सोयाबीन तेलासाठी वापरलेले पुनर्वापरित टिन आढळल्याने ५०४.४० लिटर तेल (₹१६.६९ लाख) जप्त करण्यात आले.
न्यूट्रास्युटिकल्स व हेल्थ सप्लिमेंट्स
भिवंडीतील एका विक्रेत्याकडून BPI Sports Advanced Mass Gainer, CLA Plus Carnitine, Essential Aminos, Liver Detox आदी उत्पादनांमध्ये Misbranding व निकृष्ट दर्जाचा संशय आढळल्याने ₹११.१९ लाखांचा साठा जप्त करण्यात आला.
गुटखा कारवाई
प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याविरोधात राज्यभर १६ गुन्हे दाखल, २१ जणांना अटक आणि १.६२ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
हॉटेल व रेस्टॉरंटवर कारवाई
राज्यातील ६० हॉटेल, रेस्टॉरंट व ढाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ आस्थापनांना सुधारणा नोटिसा, तर ५ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
परवाना निलंबित करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये याराना फॅमिली गार्डन रेस्टॉरंट (नागपूर), इंडियन तंदूर (नागपूर), द हट फॅमिली रेस्टॉरंट अँड ढाबा (नागपूर), अलकरीम रेस्टॉरंट (अमरावती) आणि रूपा हॉटेल (गोरेगाव, मुंबई) यांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.
