Download App

कोल्हापूर-हातकणंगले : राष्ट्रवादीचं झालं थोडं अन् आता काँग्रेसनं धाडलं घोडं… शिवसेना कोंडीत!

कोल्हापूर : सध्या शिवसेना (UBT) कडे असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा ताजा असतानाच आता काँग्रेसनेही दोन्ही जागांसाठी फिल्डिंग लावली आहे. “ज्या जागा आता आमच्याकडे नाहीत पण आमची शक्ती तिथं आहे, अशा जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी चर्चा करणार आहे. जिल्हातील आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथे काँग्रेसची ताकद आहे”, असं म्हणतं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर-हातकणंगले या जागांवर दावा सांगितला आहे. (After NCP Congress also claim on Kolhapur and Hatkangale Lok Sabha constituency)

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

मोठा भाऊ-लहान भाऊ विषय नाही :

मोठा भाऊ, लहान भाऊ हे आम्ही सांगण्याऐवजी ते चॅनलनेच सांगितलं आहे. पण आम्ही कोणीही त्यावर वाद घालू इच्छित नाही. शेवटी एकत्र येणं, परिस्थितीला सामोर जाणं निवडणुकाला सामोर जाणं आणि भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं हा उद्देश आमचा. आघाडीतील तिन्ही पक्षांचा हा उद्देश आहे आणि आम्ही त्यात यशस्वी होऊ.

कोल्हापूर-हातकणंगलेवर दावा :

अशा काही जागा ज्या आज आमच्याकडे नाही परंतु आमची शक्ती तिथे आहे. मेरिटवर शक्ती आहे. म्हणजे आमचे आमदार आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या संस्था काँग्रेसकडे आहेत, त्या जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यात कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांबाबत ही चर्चा झाली आहे. एकत्र बसल्यानंतर यासाठी आग्रह करु आणि या जागा काँग्रेसकडे घेऊन निवडून आणू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

कोल्हापूरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना (UBT) कडे :

कोल्हापूरमध्ये लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. यातील कोल्हापूरमधून संजय मंडलिक तर हातकणंगलेतून धैर्यशिल माने खासदार आहेत. 2019 मध्ये दोघेही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून गेले होते. मात्र राज्याती बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये हे दोन्ही खासदार सध्या ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गोटात दाखल झाले आहेत. मात्र शिवसेना (UBT) निवडून आलेल्या जागा सोडणार नाही. त्या आमच्याकडेच राहतील असा दावा. खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचाही दावा :

2 दिवसांपूर्वीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा आढावा बैठक पार पडली. यात राष्ट्रवादीने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांचा आढावा घेतला. यानुसार कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ तर हातकणंगलेमधून जयंत पाटील यांच्या उमेदवारीवर चाचपणी करण्यात आली. तसंच “उद्धव ठाकरे साहेब यांना समजावून सांगितले पाहिजे की, कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी. ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास आपण जिंकू शकतो. शिवसेनेचे आधी जितके आमदार निवडून आले होते ते आता नाहीत. उलट या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसचे 3 आमदार आहेत. त्यामुळे आमच्याकडे नेहमी राहिलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळावा, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली.

कोल्हापूर – हातकणंगले मतदारसंघातील सदय स्थिती :

कोल्हापूर लोकसभेच्या 6 विधानसभा पैकी तब्बल 5 जागा दोन्ही काँग्रेसकडे आहेत. यात कोल्हापूर उत्तर : जयश्री जाधव (काँग्रेस), कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील (काँग्रेस), करवीर : पी. एन. पाटील (काँग्रेस), कागल : हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस), चंदगड : राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा समावेश आहे.

तर हातकणंगले मतदारसंघामधील 6 पैकी 1 जागा काँग्रेसकडे, 2 जागा राष्ट्रवादीकडे आणि 3 जागा भाजप-शिंदेच्या शिवसेनेच्या मित्रपक्षांकडे आणि सहयोगी आमदारांकडे आहे. यात हातकणंगले : राजू आवळे (काँग्रेस), इस्लामपूर : जयंत पाटील (राष्ट्रवादी), शिराळा :मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. याशिवाय मुदत संपण्यापूर्वी काही नगरपालिका, कोल्हापूर महापालिका काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. सोबतच कोल्हापूर जिल्हा परिषदेवरही सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे.

Tags

follow us