Ahilyanagar : शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी बस व वाहने (Ahilyanagar) सुरक्षित असावीत यासाठी प्रत्येक वाहनामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी घार्गे बोलत होते.
बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, चंद्रकांत खेमनर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना घार्गे म्हणाले की, प्रत्येक शालेय बस वा वाहनामध्ये सीसीटीव्हीची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. ६ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी बस किंवा वाहनांमध्ये महिला कर्मचारीची नियुक्ती करण्यात यावी. शालेय बस वा वाहनांवर अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे लिहावा.
अहिल्यानगरकरांनो लक्ष द्या! जोरदार पाऊस होणार; हवामान विभागाने जिल्ह्यासाठी दिला येलो अलर्ट
अवैध वाहतुकीविरोधात संबंधित विभागांनी संयुक्तपणे मोहिम राबवून दोषी वाहनांवर तातडीने कारवाई करावी. विद्यार्थ्यांची चढ-उतार फक्त शाळेच्या पार्किंगमध्येच सुरक्षितपणे होईल, यासाठी सर्व बसेस तिथेच उभ्या कराव्यात. रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चढ-उतार करू नये. प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाने जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी. तसंच, सर्व शाळांनी परिवहन समितीच्या बैठका नियमित घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
राज्यातच नाही तर देशभरात अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. शाळेत ने आण करणाऱ्या गाडीचा चालक कधी वाईट कृत्य करतो तर कधी नशेत गाडी चालवत असतो. या सगळ्या गोष्टींना आळा बसण्यासाठी या गोष्टी आता जिल्हा स्थरावर अवलंबल्या जात आहेत. अशा गोष्टींमुळं काही प्रमाणात नक्कीच फरक पडेल असं बोललं जात आहे.