बिनविरोधच्या बैठकांत एकीचा मुखवटा; थोरात-विखे एकत्र, तर शिंदे-लंकेंची स्वतंत्र रणनीती

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या. एकीकडे सर्वपक्षीय एकजुटीचे चित्र उभे केले गेले, तर दुसरीकडे उमेदवारांची जुळवाजुळव आणि स्वतंत्र पॅनलची तयारी सुरूच राहिली असे चर्चा देखील आता रंगू लागले आहे. सर्वात प्रथम संगमनेरमध्ये बैठक पार पडली तेथे खासदार निलेश लंके सभापती राम शिंदे व शिवसेना शिंदे गट यांना देखील कल्पना नसल्याचे सांगितले होते त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी देखील यावर नाराजगी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून सर्किट हाऊसमधील बैठकीत नेत्यांचे एकत्रित आलेले सर्वांसमोर आले त्यानंतरही निवडणूक बिनविरोध होण्याबाबतचा तिढा कायम राहिला. त्यामुळे बिनविरोधच्या बैठकांमधील एकी आणि प्रत्यक्ष निवडणुकीतील राजकीय गणिते यांच्यातील अंतर स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक म्हणजे केवळ 21 संचालक निवडण्याची प्रक्रिया नाही, तर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील राजकीय वर्चस्वाची लढाई आहे. त्यामुळेच सुरुवातीपासून बिनविरोधचा आग्रह धरला जात असतानाही उमेदवारी अर्ज दाखल करणे एकमेकांच्या अर्जांवर हरकती घेणे, समर्थकांच्या बैठका घेणे आणि माघारीसाठी प्रयत्न करणे, अशा घडामोडींना वेग आला होता. बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन झाले मात्र, प्रत्यक्षात सर्वांचे राजकीय हितसंबंध एकाच ठिकाणी येऊ शकले नाहीत.

सर्किट हाऊसमध्ये एकीचे छायाचित्र; बाहेर राजकीय गणितांची जुळवाजुळव

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा संदेश देण्यासाठी सर्किट हाऊसमधील बैठकीला प्रसारमाध्यमांनाही बोलावण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख नेते एकत्र आले. चर्चा झाली निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू असल्याचे चित्र समोर आले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून यापूर्वीही बैठका झाल्या होत्या. सुजय विखे पाटील यांची या प्रक्रियेत उपस्थिती होती. मात्र, थोरात आणि विखे कुटुंबीयांमधील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी पाहता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची थोरात यांच्यासोबतची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. बैठकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना मानाचे स्थान देण्यात आले. त्यांच्या दोन्ही बाजूंना थोरात आणि विखे पाटील दिसले. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती, एकत्रित छायाचित्र आणि बिनविरोधचा सूर यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकीचा संदेश गेला. मात्र या बैठकीतून निवडणुकीबाबत सर्वमान्य तोडगा निघाला नाही असे आज स्पष्ट झाले आहे. बैठकीच्या काळात आणि त्यानंतरही वेगवेगळ्या गटांकडून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे बिनविरोधसाठीच्या चर्चेबरोबरच स्वतंत्र पॅनलची तयारीही सुरू असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, एकत्रित बैठकीनंतरही निवडणुकीचा तिढा सुटण्याऐवजी राजकीय समीकरणांची चर्चा अधिक रंगली.

थोरात-विखे एकत्र; शिंदे-लंके यांची स्वतंत्र दिशा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील एकाच बैठकीत दिसणे ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधील दीर्घकालीन राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्यामागे सहकार क्षेत्रातील समीकरणे महत्त्वाची ठरली आहेत. दुसरीकडे सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले होते. हे दोन्ही नेते बैठकीला उपस्थित राहिल्याने बिनविरोधच्या चर्चेत सहभागी होण्याची भूमिका त्यांनी दाखवली. बैठकीतील उपस्थिती म्हणजे सर्व राजकीय मतभेद संपले की काय असा सवाल उपस्थित झालता परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक समीकरणे, समर्थकांची ताकद आणि उमेदवारांची माघार यांना महत्त्व आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर आलेले नेते प्रत्यक्ष निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या मागे उभे राहतात, हेच निर्णायक ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या पैशांचा हिशेब कोण देणार?

राजकीय बैठकांचा गाजावाजा सुरू असताना जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारांबाबतचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण ही बँक सर्वसामान्य शेतकरी, ठेवीदार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या नागरिकांच्या विश्वासावर उभी आहे.बँकेकडे सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे सांगितले जाते. या ठेवींच्या सुरक्षिततेबरोबरच कर्जवाटप, थकबाकी आणि आर्थिक शिस्त यांचाही विचार होणे आवश्यक आहे. साखर कारखान्यांना दिलेल्या मोठ्या कर्जांची स्थिती, त्यातील थकबाकी आणि वसुली याबाबत पारदर्शक माहिती समोर येणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मिळालेल्या कर्जाचा आकडा पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा केला जात आहे.

या कर्जांपैकी नेमकी किती रक्कम थकीत आहे किती वसुली झाली आहे आणि किती कर्ज नियमित आहे, याची अधिकृत आकडेवारी तपासणे आवश्यक आहे.बँकेच्या संचालकपदासाठी राजकीय नेत्यांमध्ये चुरस सुरू असताना ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षितता, शेतकऱ्यांना मिळणारे पीककर्ज आणि थकीत कर्जांची वसुली हे मुद्देही चर्चेच्या केंद्रस्थानी असायला हवेत. संचालकपदाची प्रतिष्ठा महत्त्वाची की बँकेच्या आर्थिक हिताचे रक्षण, हा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जगताप, ससाणे, राजळे बिनविरोध; काही जागांवर माघारीचे गणित

बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना काही मतदारसंघांत यश मिळाले आहे. श्रीरामपूर सेवा संस्था मतदारसंघातून करण ससाणे यांच्याविरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ते बिनविरोध झाले. पाथर्डी सोसायटी मतदारसंघातून शेटे यांनी माघार घेतल्याने आमदार मोनिका राजळे यांचा मार्ग मोकळा झाला. बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांचीही बिनविरोध निवड झाली. काही जागांवरील बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला म्हणून संपूर्ण निवडणूक बिनविरोध होईल अनेक मतदारसंघांत उमेदवारांची संख्या, स्थानिक गटबाजी आणि माघारीबाबतची अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे काही ठिकाणी बिनविरोध, तर अन्य ठिकाणी थेट लढत होणार आहे.

राहुल जगतापांची माघार; पाचपुते गटाचे गणित बदलले

कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल जगताप यांनी स्वतःसह पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. राहुल जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क झाल्याची चर्चा आहे. कुकडी कारखान्याला मदतीचा शब्द देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. यानंतर राहुल जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. समर्थकांशी विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.राहुल जगताप यांच्या माघारीनंतरही दत्तात्रय पानसरे यांची उमेदवारी कायम असल्याने या मतदारसंघातील राजकीय गणित संपलेले नाही. पाचपुते-नागवडे गटाची पुढील भूमिका आणि पानसरे यांना मिळणारा प्रतिसाद याकडे लक्ष लागले आहे.

सभापती राम शिंदेंनी चार उमेदवारांची नावे जाहीर केली

बिनविरोधच्या चर्चांदरम्यान सभापती राम शिंदे यांनी आपल्या समाजमाध्यम खात्यावरून चार उमेदवारांची नावे जाहीर केली. जामखेड सोसायटी मतदारसंघातून सचिन घुमरे, कर्जत मतदारसंघातून ज्योती प्रकाश शिंदे, महिला राखीव मतदारसंघातून मंजुषा राजेंद्र गुंड आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आजीनाथ रामभाऊ हजारे यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला. बिनविरोधसाठीच्या बैठकांमध्ये सहभागी होत असतानाच उमेदवार जाहीर करण्याच्या या भूमिकेमुळे निवडणुकीची तयारीही समांतर सुरू असल्याचे दिसून आले.

गायकर-घुले यांची माघार; कुटुंबातील उमेदवारी कायम

जिल्हा बँकेत सलग दहा वर्षे संचालक म्हणून काम केल्याच्या पार्श्वभूमीवर सीताराम गायकर आणि चंद्रशेखर घुले पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाले होते. दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले.चंद्रशेखर घुले यांच्या माघारीनंतर शेवगाव सोसायटी मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राजश्री घुले पाटील यांचा बिनविरोध संचालक होण्याचा मार्ग मोकळा झाला. अकोले सोसायटी मतदारसंघातून सीताराम गायकर यांनी माघार घेतली असली, तरी त्यांची मुलगी संजीवनी गोविंद शिंदे यांचा अर्ज कायम असल्याचे सांगितले जातेत्यामुळे काही ठिकाणी उमेदवारांच्या माघारीतून बिनविरोधचा मार्ग खुला होत असताना, अन्य ठिकाणी पर्यायी उमेदवारांच्या माध्यमातून राजकीय समीकरणे टिकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

सचिन सानप कोण हे 27 तारखेला महाराष्ट्राला कळेल

बिनविरोधचा आग्रह पण निवडणुकीची तयारीही जोरात

अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी ज्येष्ठ नेत्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत अनेकांनी पुढाकार घेतला. बैठकांमध्ये एकत्र येण्याचे आवाहन झाले. उमेदवारी अर्ज, हरकती, माघारी आणि स्वतंत्र उमेदवारांची घोषणा या घडामोडी थांबलेल्या नाहीत. काही जागांवर बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला असला, तरी सर्व जागांवर एकमत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे उर्वरित जागांवर निवडणूक होण्याची शक्यता कायम आहे. एकीकडे बिनविरोधची भाषा, दुसरीकडे उमेदवारांची जुळवाजुळव एकाच व्यासपीठावर नेते, पण निवडणुकीत स्वतंत्र राजकीय गणिते जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील हीच सद्यस्थिती आहे. आता माघारीच्या अंतिम टप्प्यात कोण माघार घेतो, कोण उमेदवारी कायम ठेवतो आणि कोणत्या मतदारसंघात थेट लढत होते यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version