VSR Company Aircraft : बारामती विमानतळावर 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निधन झाले होते. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान व्हिएसआर कंपनीचे होते. अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहे. तर नुकतंच त्यांनी 16 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्हिएसआर कंपनी, कंपनीचे मालक आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे आता अजित पवारांच्या मृत्यूच्या 14 महिने आधीचे विमान प्रवासाबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, अजित पवार हे खुद्द व्हीएसआर कंपनीला प्रवासासाठी पसंती देत होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर 2024 ते 28 जानेवारी 2026 या 14 महिन्यांच्या कालावधीमध्ये अजित पवारांनी 104 वेळेला चार्टर विमानातून प्रवास केला. या 104 पैकी 85 प्रवास हे अजित पवारांचे व्हिएसआर कंपनीच्या विमानातून (VSR Company Aircraft) केलेले होते. तर फक्त 19 विमान प्रवास त्यांनी दुसऱ्या कंपनीच्या विमानातून केले होते. या माहितीनुसार, त्यांनी जवळपास 82 ते 83 टक्के विमान प्रवास व्हीएसआर कंपनीच्या विमानातून केलं होतं. तसेच पवार कुटुंबियातील इतर सदस्य शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा इतर सदस्य देखील व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार (Ajit Pawar) मृत्यू प्रकरणात व्हीएसआर कंपनीच्या मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आहे.
वेलिंग्टन टेस्ट, पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व ; हेन्नी निकोल्सची शानदार फलंदाजी
अजित पवारांचा विमान प्रवासाचा डेटा समोर आल्याने आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या डेटानुसार अजित पवार यांनी 104 पैकी 82 ते 83 वेळा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला होता. तर रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकांवरीत गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्या दिवशीच्या जो काही घटनाक्रम होता आणि व्हीएसआर कंपनीच्या विमान सेवेमध्ये काही चुका आहेत या आधारावर कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. यासाठी त्यांनी मुंबईला आणि मग बारामतीला दोन वेळेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
