Ajit Pawar : ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. धमक्यांची भाषा केली जात आहे. युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या, दगडफेक काय करता ? आमदार प्रज्ञा सातव (Prdnya Satav) यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,’ अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.
ते पुढे म्हणाले, की ‘या घटना आपण का सहन करतोय, ही लोकशाही आहे. या प्रकारांचा आपल्या सगळ्यांनीच निषेध केला पाहिजे. आमदार प्रज्ञा सातव हल्ला प्रकरणातील खरा मास्टरमाइंड शोधून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीनेही कारवाई करता येते. फक्त राज्यकर्त्यांमध्ये तेवढे धाडस आणि धमक असली पाहिजे.’
‘राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचाही मृत्यू झाला. पत्रकार लिखाणातून टीका करायचे. त्यानंतर आम्ही मात्र आमचे कुठे चुकले याचे आत्मचिंतन करायचो. कारभारात सुधारणा करून पुन्हा जनतेसमोर जाऊ, अशी भावना असायची. पण, आम्ही कधी पत्रकारांना अटक केली नाही त्यांना कधी थांबवले नाही,’ असे पवार म्हणाले. ‘वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचे काम सरकारने करावे,’ अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.