मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांचा समतोल विकास होण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांची कामे रखडली आहेत. राज्यातल्या जनतेची सहनशीलता संपली असून सत्ताधाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. तसेच पुण्यात सुरु झालेली मेट्रो नागरिकांसाठी काही कामाची नसल्याचे सांगत पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहलीसाठी, वाढदिवस साजरे करण्यासाठी, जादूचे प्रयोग करण्यासाठी होत असल्याची टीका करत पुणे मेट्रोसह रिंग रोडच्या कामाला गती देण्याची मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार ‘२९३’च्या प्रस्तावावर बोलताना म्हणाले, राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याने गेल्या काही वर्षात राज्याचं ग्रोथ इंजिन म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळं पुण्याचा विकास हा राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई व इतर शहरांसोबत पुण्याच्या विकासावर आम्ही जास्त लक्ष केंद्रीत केलं होतं.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्यासह राज्यात अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मी मंत्रालयात माझ्या कार्यालयात ‘प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट’च्या माध्यमातून विकास कामांचा आढावा दर पंधरा दिवसांपासून घेत होतो. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात सुध्दा राज्यातल्या विकासांची गती कायम राहिली.