मुंबई : पुण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या रिंगरोडसाठी आवश्यक सर्व जागेची मोजणी करुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतुद भूसंपादनासाठी केली. पुण्याचा विस्तार बघता पुणे शहरासाठी दोन रिंग रोडची आवश्यकता आहे. ‘पीएमआरडी’च्या माध्यमातून दुसऱ्या रिंगरोडचे सुध्दा काम हाती घ्यावे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ‘२९३’च्या प्रस्तावावर बोलत होते. ते म्हणाले की, ‘सारथी’ या संस्थेला स्वत:चे कार्यालय नव्हते, त्यासाठी शिवाजीनगर येथे असणारी शालेय शिक्षण विभागाची जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच सारथीसह महाज्योती संस्थेसाठी सुध्दा भरीव निधीची तरतुद करण्यात आली.
पुणे शहरात कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, सहकार भवन, कामगार भवन, नवीन प्रशासकीय इमारत, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, नवीन पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, नोंदणी भवन, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे नवीन प्रशासकीय भवन, बंड गार्डन पोलीस स्टेशनसाठी जागा, पिंपरी-चिंचवड येथील नवीन पोलीस आयुक्तालयाची जागा तसेच साखर संग्रहालयासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतुद महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली आहे. आता या कामाला गती देण्याची गरज, अजित पवार यांनी बोलून दाखवली.
Ajit Pawar म्हणतात… पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहली, वाढदिवसासाठी!
अजित पवार म्हणाकले की, पुणे आणि नाशिकच्या कनेक्टिविटीसाठी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ८०० कोटी रुपयांची तरतुद करुन ९० टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. या पुणे-नाशिक रेल्वेचा पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी फायदा होणार आहे. पुणे शहराजवळ ३०० एकर जागेत अत्याधुनिक “इंद्रायणी मेडिसीटी” उभारण्यात येणार याबाबत महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. या वसाहतीत रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस, फिजीओथेरपी केंद्र उपलब्ध असतील. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरणार आहे. सरकारने या प्रकल्पाला गती द्यावी.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहेत. मात्र या दोन्ही शहरात झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. या शहराला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी झोपडपट्टीवासियांचे योग्य पुनर्वसन करुन विविध माध्यमातून त्यांना पक्की आणि हक्कांची घरे उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.