दिल्लीतील रिसेप्शनपासून विमान प्रवासापर्यंत… रोहित पवारांनी मांडले संशयाचे धागे; अजितदादा अपघात पुन्हा चर्चेत

रोहित पवार यांनी काही धक्कादायक आणि संशय निर्माण करणारे मुद्दे मांडले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Untitled Design 61

Untitled Design 61

Ajitdada accident in the news again : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर केलेल्या सविस्तर पोस्टमधून रोहित पवार यांनी काही धक्कादायक आणि संशय निर्माण करणारे मुद्दे मांडले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, दिल्लीमध्ये एका पत्रकाराच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहिल्यानंतर महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठा नेता VSR कंपनीच्या विमानाने परत आला.

विशेष म्हणजे, प्रायव्हेट व्हर्टर टर्मिनलवर त्या नेत्याचे स्वागत स्वतः VSR कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांनी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी दोघांमध्ये हस्तांदोलन झाले आणि त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही कागदही देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आणताना रोहित पवार म्हणतात की, अजित पवार यांच्या अपघातातील मृत पायलट कपूर यांचा मुलगाच संबंधित नेत्याच्या विमानाचा पायलट होता. या सर्व घडामोडींमुळे संशय अधिकच गडद होत असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाकडे हल्ल्यात पाहू नये. तसेच VSR कंपनीवर अंधविश्वास दाखवू नये आणि त्या कंपनीच्या विमानाने प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे देखील त्यांनी सुचवले आहे. व्ही. के. सिंग याना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, असा अप्रत्यक्ष सल्ला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. याशिवाय, आंध्रप्रदेशमध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये मध्यस्थ किंवा दलाल म्हणून काम केल्याच्या आरोपांचा संदर्भ देत, सध्या महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रकल्पांमध्ये VSR कंपनीची भूमिका वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ही माहिती सत्य असल्यास राज्य सरकारच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात, असे देखील त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणात सत्ताधारी पक्षाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नसून AAIB च्या अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचे दिसून येते. मात्र, एवढ्या गंभीर आरोपांनंतर देखील शांतता का पाळली जात आहे, याबाबत रोहित पवार यांनी नाराजी वव्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, या प्रकरणाची सीबीआयमार्फत सखील चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version