Ashok Kharat Case : नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्या पाशवी कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक वळण आले आहे. ज्या ‘ऑफिसबॉय’वर खरातचा सर्वाधिक विश्वास होता, तोच या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याने ५८ महिलांच्या अब्रूचा बाजार मांडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ५८ महिलांच्या अब्रूचा बाजार मांडणाऱ्या या प्रकरणाचा तपास आता थेट SIT च्या हातात गेला आहे.
नाशिकमधील ‘ओजस प्रॉपर्टीज’मध्ये काय चालायचे?
नाशिकचे कॅनडा कॉर्नर… येथील ‘ओजस प्रॉपर्टीज’ हे कार्यालय केवळ प्रॉपर्टी डीलचे केंद्र नव्हते, तर ते एका क्रूर वासनांधाचा अड्डा बनले होते. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातने येथे अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. पण विकृती इथेच थांबली नाही. खरातने या अत्याचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ जतन करून ठेवले होते.
अन् खरातच्या वासनांध साम्राज्याचा खरा चेहरा जगासमोर आला
या प्रकरणाला वळण मिळाले जेव्हा खरातचा ‘खास’ माणूस आणि ऑफिसबॉय नीरज जाधव याने आपल्याच मालकाचा गेम केला. डिसेंबर २०२५ मध्ये नीरजने खरातच्या नकळत ५८ महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले. पैशांच्या हावेपोटी त्याने चक्क खरातलाच ५ कोटींची खंडणी मागून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.मात्र, खरातने खंडणी देण्याऐवजी वावी पोलिसांत धाव घेतली.
पैसे मिळत नाहीत हे पाहून नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवला आणि सुरू झाला महिलांच्या अब्रूचा बाजार नीरजने शिर्डीतील एका विवाहितेचे व्हिडिओ पाठवून तिला धमकावले. खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिला पोलिसांत जाण्यास सांगितले. पण खरा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा नीरजने सिडकोतील एका महिलेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला. मेहुण्याने धीर दिला आणि ही पीडिता सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोहोचली. तिथेच खरातच्या वासनांध साम्राज्याचा खरा चेहरा जगासमोर आला.
या प्रकरणाचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांशी आणि मंत्र्यांशी जोडले गेल्याचे संशय आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने ‘SIT’ स्थापन केली आहे. पुण्याच्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी आज नाशिकमध्ये दाखल होत खरातची दोन तास कसून चौकशी केली. नीरज जाधवलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
