मुंबई : आज विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच अनावरण करण्यात आलंय. चित्रकार किशोर नादवडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र रेखाटलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांना वाटलं असतं तर ते मुख्यमंत्रीही झाले असते. मात्र त्यांनी सर्वच समाजघटकातील लोकांना निवडुन आणलं, या शब्दांत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलंय.
फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांनी एकदा बोललेला शब्द बाळासाहेबांनी कधीही मागे घेतला नाही. त्यांनी तत्वाचं राजकारण केलं असून बाळासाहेबांना वाटलं असतं तर ते मुख्यमंत्रीही झाले असते. मात्र त्यांनी सर्वच समाजघटकातील लोकांना निवडुन आणलं, असल्याचं म्हंटलंय.
बाळासाहेबांसारखा नेता सर्वांना हवाहवासारखा वाटत आहे, त्यांनी कधीही जातपात पाहिली नाही. आज मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांकडे पाहुन प्रेरणा घेईल, मराठी माणसाच्या भल्यासाठी हिंदुत्वासाठी प्रत्येक व्यक्ती प्रेरणा घेऊन काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चित्रकार किशोर नादवडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र रेखाटलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रयत्नातून हे तैलचित्र साकारण्यात आल्याने त्यांचे विशेष आभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आहेत.
तैलचित्र अनावरण सोहळ्यासाठी राज्यभरातील तमाम शिवसैनिकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती निलम गोर्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबादास दानवे यांच्यासह भाजप-शिंदे गटाचे खासदार, आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते.
या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेत्यांना हजेरी लावली होती. दरम्यान, यावेळी ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले आहे. यावेळी अनेक नेत्यांनी बाळासाहेबांबद्दल आपले विचार मांडले आहेत.