श्रीगोंदा : काँग्रेस पक्ष सध्या अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. मात्र, आता राज्यातच नव्हे तर सबंध देशातील वातावरण बदलत आहे. अशा वातावरणात कार्यकर्ते अधिक ताकदीने लढल्यास काँग्रेस लवकरच पुन्हा दिमाखात उभी राहील, असा विश्वास काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार थोरात यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी आ. थोरात म्हणाले, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राजकारण आणि धर्माची सरमिसळ करून सामान्यांची दिशाभूल करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपच्या जातीयवादी राजकारणातून देशाची सुटका करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताकदीने लढण्याची गरज आहे. देशभरात बदलाचे वारे वाहत आहेत, कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्यास काँग्रेसचे भवितव्य अधिक उज्वल असेल.
माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात काँग्रेस नव्याने भरारी घेईल. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे.
आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, नगर जिल्ह्याने आ. बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व राज्याला दिले आहे. त्यांच्यामुळे मला विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. थोरात आणि नागवडे कुटुंबाचे दोन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. ते माझ्याप्रमाणेच नागवडे कुटुंबाला देखील ताकद देतील, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला.
राजेंद्र नागवडे म्हणाले, सरकारच्या दडपशाहीमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडताना पक्षावाढीसाठी जिल्ह्यात ताकदीने काम करू. भाजपच्या जातीयवादी राजकारणाविरोधात जिल्ह्यात लढा उभा करू.
यावेळी आ. लहू कानडे, बाबासाहेब भोस, हेमंत ओगले, अनुराधा नागवडे, उत्कर्षा रुपवते, संपतराव म्हस्के, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, आदी उपस्थित होते. प्रा. शंकर गवते यांनी सूत्रसंचालन केले तर स्मितल वाबळे यांनी आभार मानले.
(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube