Sharad Pawar On Baramati by-Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी आज प्रचार संपला असून बारामती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सांगता सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना जास्तीत जास्त मतांनी विजय करण्याचे आवाहन बारामतीकरांना केला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी देखील आता बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन करत यंदा प्रकृती बिघडल्याने मतदानाचा हक्क बजावणार नसल्याची माहिती दिली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक्सवर लिहिले की, मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati by-Election) महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत (Mumbai) रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.
मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 21, 2026
आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.
मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो असं शरद पवार यांनी एक्सवर लिहिले आहे.
