आसाममधील भीमेश्वर धाम मंदिराला वर्तमानपत्रातील जाहिरातीद्वारे भीमाशंकर ( Bhimashankar ) मंदिर असे भासवून तेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे दाखवण्याचे छद्मउद्योग भाजपाप्रणित ( BJP ) आसाम राज्य सरकारतर्फे केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील ( Dilip Valase Patil ) यांनी केला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील पुरोगामी युगपुरुष, राष्ट्रपुरुष, लोकोत्तर समाजधुरीण हायजॅक करण्याचे उद्योग आपण पाहिले. राजकीय पक्षात पैशाच्या जोरावर फुटीरता पेरून चिन्हासकट पक्ष बळकावण्याचे निलाजरे प्रयत्न आपण रोज पाहतो आहोत. पण आता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले एखादे देवस्थानच पळवण्याचा प्रयोग होताना प्रथमच पाहायला मिळत आहे, असा घणाघात वळसे पाटील यांनी केला आहे.
पौराणिक आधारानुसार वस्तुस्थिती काय?
आसाममध्ये भीमेश्वर धाम मंदिर अस्तित्वात आहे. पण ते द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी नाही. कुंभकर्णाला कर्कटीपासून झालेला पुत्र भिमासूर हा ब्रह्म वरदान प्राप्त झाल्यामुळे देवांना अनावर झाला होता. भगवान विष्णूंवरही त्याने मात केल्याचं पुराणामध्ये सांगितलेले आहे. अखेरीस श्री शंकर महादेवांनी त्या भिमासुराचा वध केला. त्याच्याशी निगडित पुराणकथा या मंदिराबाबत सांगितली जाते. हे ठिकाण आसाममध्ये गोहाटीजवळ आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अतिशय पवित्र देवस्थान मानलं जातं. या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. मूळ मंदिर हेमाडपंथी असून साधारणतः 1200 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. वेळोवेळी महाराष्ट्रातील शासकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
गतसालापासून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ वारंवार आसाममध्ये गोहाटीला जायला लागल्यापासून आणि महाराष्ट्रातील शक्तिपीठांच्या ऐवजी आसाममधील शक्तिपीठांकडे जाऊन नवस फेडायला लागल्यापासून आता आसाममधील भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने महाराष्ट्राचा मानभंग करण्याची एकही संधी सोडायची नाही असे ठरवले आहे, अशी टीका वळसे पाटलांनी केली आहे.
हा केवळ एका देवस्थानाच्या श्रद्धेचा प्रश्न नाही. केंद्राच्या पाठबळाने महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक वीण खिळखिळी करण्याचे हे कारस्थान आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक पळवली जाते, महाराष्ट्रातली आर्थिक केंद्रं गुजरातकडे वळवली जातात, महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमावादात भाजपाचे नेतृत्त्वच बोटचेपी भूमिका घेतं. महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमाही सुरक्षित नाहीत आणि आता तर पवित्र श्रद्धास्थानंही यांच्या कारस्थानांमधून सुटत नाही. महाराष्ट्रातल्या पवित्र शैव परंपरांनाही राजकारणापायी नख लावायला हे मागेपुढे पाहत नाहीत, असा घणाघात दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हेमतं बिस्वा शर्मा यांनी भीमाशंकर ज्योतीर्लिंग हे आसाममध्ये असल्याचे पोस्टर शेअरे केले आहे. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.