Bhojpuri songs played at railway stations in Mumbai : मुंबईत मराठी आणि परप्रांतीय वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाऊबिजेसारख्या मराठी संस्कृतीतील महत्वाच्या सणाच्या दिवशी मुंबई आणि नवी मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर मोठ्या आवाजात भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वडाळा, सानपाडा, नेरुळ, आंबिवली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह काही रेल्वे स्थानकांवरील भोजपुरी गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे मराठी प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून, महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, येत्या रविवारी छटपूजा असल्याने मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर अधून मधून भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, भाऊबीजेच्या दिवशी मराठी सणाला प्राधान्य देण्याऐवजी भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याने मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने या प्रकारावर आक्षेप घेतला आहे. वडाळा रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याच्या प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका माधुरी मांजरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर मनसे नेते राजू पाटील यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकारावरून सरकारला लक्ष्य केले आहे.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
रज्जू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आज महाराष्ट्रात भाऊ-बहीण या पवित्र नात्याचा सन्मान करणारा भाऊबीजेचा सण आहे. मग महाराष्ट्रातील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर भाऊबीजेच्या मराठी गाणी का ऐकू येऊ नयेत? महाराष्ट्राच्या सण-उत्सवांना आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी छठपूजेची गाणी वाजवून परप्रांतीय सणांचा उत्सव साजरा करण्याची गरज काय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
मात्र, राजू पाटील यांनी छठपूजेला किंवा कोणत्याही समाजाच्या सणाला विरोध नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. प्रश्न कोणत्याही सणाचा विरोध करण्याचा नसून महाराष्ट्रात मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या सणांना योग्य सन्मान मिळणार की नाही, हा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारला कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल विचारला जात होता. आज हाच प्रश्न भाजपला विचारण्याची वेळ आली असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
सरकारी कार्यालयात फाइल अडकवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका! कामात दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई
दरम्यान, आंबिवली रेल्वे स्थानकावर देखील भाऊबीजेच्या दिवशी भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारावर कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर स्थानिक भाषा आणि संस्कृतीला प्राधान्य मिळायला हवं, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
एकीकडे छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याची सांगितले जात आहे, तर दुसरीकडे भाऊबीजेच्या दिवशी मराठी सण आणि संस्कृतीला प्राधान्य का दिलं गेलं नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील गाण्यांचा हा मुद्दा आता केवळ सांस्कृतिक न राहता महाराष्ट्राच्या राजकारणात देखील चर्चेचा विषय बनला आहे. मनसे आणि ठाकरे सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेतं आणि याप्रकरणी काही स्पष्टीकरण देतं का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.
