Bhor Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या भोर नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामचंद्र आवारे 170 मतांनी विजय झाले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र आवारे विजयी झाल्याने भोरमध्ये माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रचारसभा घेतल्याने भोरमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भोर नगरपालिकेत (Bhor Election Result) भाजप बाजी मारणार का? याबाबत अनेक तर्कविर्तक लावण्यात येत होते मात्र भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुन्हा एकदा माजी आमदार संग्राम थोपटे यांना मोठा धक्का देत भोर नगरपालिका आपल्याकडे राखली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेविरुद्ध महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) अशी लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र तरीही संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यातील संघर्ष सुरुच होता. थोपटे यांना विधानसभात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या भोर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी मोठी ताकद लावल्याने ही निवडणूक अतितटीची झाली होती.
अखेर या निवडणुकीत रामचंद्र आवारे यांनी 170 मतांनी थोपटे यांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव केला आहे. रामचंद्र आवारे यांना ऐन निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला होता.
