राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या आपल्या सूचक वक्तव्याने अनेकदा सर्वांना संभ्रमात टाकून देत असतात. सध्या त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या पक्षात नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे विरुद्ध शिंदे निकाल हा कोणाच्या बाजूने लागणार आहे, यासाठी देखील अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या खटल्याच्या निकालानंतर 16 आमदार अपात्र होणार का याबाबत देखील अनेक अंदाज बांधले जात आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
देवेंद्र फडणवीस हे कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावरून परत येत असताना त्यांनी कोल्हापूरच्या चंदगड मध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांशी संवाद देखील साधला.
ते म्हणाले, “पाटील साहेब तुम्हाला एवढेच सांगतो की, इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवत नरसिंग आहे. आपण कुठूनही प्रगती करतो”‘ असे फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.