मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांना दुखापत झाली होती. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय. या दरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीय.
राजकीय हाडवैरी असलेले भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे नात्यानं बहीण-भाऊ आहेत. हे भाऊ-बहीण राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बीड, परळी येथील विकासकामांच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात.
आता मात्र राजकीय वैर मागं सोडून पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भाऊ धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीला गेल्याचे काही फोटो व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसताहेत.
आठ दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी ( दि.3) रात्री 12 च्या सुमारास परळीमध्ये अपघात झाला होता. मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून तशी माहिती देण्यात आली होती. मतदारसंघातील कार्यक्रम उरकून रात्री परळीकडं परत जाताना हा अपघात झाला होता. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळं अपघाताची घटना घडली होती.
त्याआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.