Pravin Darekar On CM Eknath Shinde Advertisement : शिवसेनेने राज्यामध्ये एक सर्व्हे केला असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रथम क्रमांकाची पसंती दर्शविण्यात आली आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. यामध्ये एकनाथ शिंदे यांना 26.1 % टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 % जनतेने कौल दिल्याचं समोर आले आहे. यानंतर मात्र, आता भाजपच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहे. भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी या जाहितीवरुन शिवसेनेला सुनावले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती दर्शवली याबाबत आम्हाला काही आक्षेप नाही. त्याचा आम्हाला आनंदच आहे कारण ते आमचे युतीचे नेते आहेत. ही जाहिरात द्यायला देखील आमची काही अडचण नव्हती. पण या जाहिरातीमध्ये एकनाथराव यांना जास्त पसंती आणि देवेंद्रजींना कमी पसंती याचा उल्लेख करण्याची काही गरज नव्हती. एकनाथराव यांची एकट्याची जाहिरात दिली असती तरी आम्ही समजू शकलो असतो. पण अशी जाहिरात देण्यामागे कुणाचा काही उद्देश आहे का? देवेंद्रजींना कमी दाखविण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उपस्थित राहतो असे दरेकर म्हणाले.
Shivsena Advertisement : भल्या मोठ्या जाहिरातीवर CM शिंदेंचं थोडक्यात उत्तर
तसेच युतीमध्ये अशी जाहिरात देणे योग्य नाही. युतीत चांगल वातावरण रहायचे असेल तर दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी समन्वयाने भूमिका घ्यावी, असे दरेकर म्हणाले. राज्यात देवेंद्र फडणवीस हेच आमचं नेतृत्व असून देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असंच आहे, असे दरेकरांनी स्पष्ट सांगितले.
दरम्यान, या सर्व्हेवरुन भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी देखील एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्रजींपेक्षा एकनाथजींन्ना पहिली पसंती? सर्वेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांक कुठे मिळेल?, असे खोचक ट्विट केले आहे. त्यामुळे या सर्व्हेच्या जाहिरातीनंतर भाजपने आपली आक्रमक प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे.
देवेंद्रजींपेक्षा एकनाथजींन्ना पहिली पसंती 🤔
सर्वेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांक कुठे मिळेल?#EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra pic.twitter.com/rxyXJfOsLu— Vishwas Pathak (@vishwasvpathak) June 13, 2023
जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असेल, नसेल पण आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहेत, हे सगळ्यात महत्वाचे आहे. शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मला काही मिळेल यासाठी युती झालेली नाही. म्हणून ही युती भक्कम आहे. शिवसेना-भाजप महायुती येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर जिंकेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.