आता मला थांबायचयं! देवेंद्रंच्या विश्वासू आमदाराचा राजकारणाला रामराम; भावनिक पत्र व्हायरल

BJP MLA Sandip Joshi यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

BJP MLA Sandip Joshi

BJP MLA Sandip Joshi

BJP MLA Sandip Joshi decided for Political Retirement who close to Devendra Fadanvis : भाजपसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याचं कारण देखील त्यांनी एक भावनिक पत्र लिहित दिलं आहे.

अभिनेत्री अक्षया नाईकची तस्करी वेब सिरींजमधील भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

याबाबत जोशी यांनी एक भावनिक पत्र लिहीलं आहे. जे त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या निर्णयाचं धक्कादायक कारणं स्पष्ट केलं आहे. आज सत्तेसाठी सुरु असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले संदीप जोशी?

आता मला थांबायचंय !

नमस्कार,
हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरु असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतः ला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे. असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे.

लंडनला जाण्यापासून डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखलं; नेमकं काय घडलं?

मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करण आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व मा. ना. नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.

महापौर पदासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग; शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील तब्बल 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना

हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन.राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो.

राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होते. या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाली. हे कार्य मात्र पुढेही अविरत सुरु राहील. कोरोनाच्या काळात एकल पालकत्त्व नशिबी आलेल्या बहिणींसाठीचा ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, मोहगाव झिल्पी येथील गोसेवा प्रकल्प, श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेले गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे सामाजिक प्रकल्प, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य ॲम्युचर हॉकी संघटना, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना, नागपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन, खासदार क्रीडा महोत्सव या क्रीडा क्षेत्रातील विविध पदांना न्याय देईन, तरुण खेळाडूंसोबत उभा राहून त्यांना प्रोत्साहन देईन.

काळ कोणासाठी थांबत नसतो. तो पुढे जातच राहतो. मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. इतरांना नाही, किमान स्वतःला न्याय देता आला, तरच जगणे अर्थपूर्ण ठरते, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि तोच निर्णय आज मी घेतला आहे.

कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर संस्कार केले. मला घडवले. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत राजकारणात अनेक संधी दिल्या. या सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देत सन्मान दिला. याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शीर्षस्थ नेतृत्वाचा कायम ऋणी राहीन.

राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील, याची मला खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे, हे मी अभिमानाने सांगतो. मात्र माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे. म्हणूनच अधिक काही न बोलता, आज मी हा निर्णय घेत आहे.
शेवटी एवढेच…

कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ, शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ। किसी और की राह रोशन हो सके, इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ।
आता मी थांबतोय….! धन्यवाद मित्रांनो…!

Exit mobile version