पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जबाबदारी दिलेले निवडणूक प्रमुख हेच उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे येथे केली. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने इच्छुक उमेदवारांना एक प्रकारे सुचक इशारा तर निवडणूक प्रमुखांना तयारीला लागाचा सुचक संदेश दिला असल्याचं बोललं जात आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसोबतच सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांचीही घोषणा केली आहे. (BJP State President Chandrashekhar Bawankule Announce that election chief will be candidate for loksabha and vidhansabha 2024 election)
भाजपने काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघ आणि सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांची घोषणा केली होती. सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून 2024 च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला विजय मिळवून देतील असा विश्वास यानंतर बोलताना बावनकुळे यांनी व्यक्त केला होता.
या घोषणेनंतर त्यावेळी देखील या यादींतील नावे पाहिल्यानंतर भविष्यात हेच उमेदवार असू शकतात अशा चर्चांना सुरुवात झाली होती. आता बावनकुळे यांनी त्याबाबतचे वक्तव्य करुन थेट या शक्यातांवर शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, भाजपने ही निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीमध्ये लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता यातील नेमके कोणते मतदारसंघ शिवसेनेला जातात आणि कोणते भाजपकडे राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपविली आहे. तर बारामती मतदारसंघाची आमदार राहुल कुल यांच्याकडे, शिरुर लोकसभा मतदारंसघाची भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडे, मावळमध्ये प्रशांत ठाकूर यांच्याकडे, कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, हातकणंगले सत्यजित देशमुख, सांगली दीपक शिंदे, सातारा अतुल भोसले, सोलापूरमध्ये प्रशांत परिचारक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघात कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे, कोपरगाव येथे स्नेहलता कोल्हे, हडपसर येथे योगेश टिळेकर, वडगाव शेरी येथे जगदीश मुळीक यांची या मतदारसंघात निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.