Barasu Refinery Protest : बारसू येथील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. या तीन दिवसांमध्ये सरकारसोबत चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारसू येथील परिसरात जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलक व पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचे पहायला मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून इथे भू सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे आंदोलक त्याठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या जागेवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारने केलेल्या वेगवेगळ्या आश्वासनांनंतर देखील आंदोलक मातीचे परीक्षण थांबवण्यावर ठाम आहेत.
मात्र यानंतर आता आंदोलकांनी काही काळ आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांमध्ये मातीचे सर्वेक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करणार असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यावेळी आता आंदोलनकर्त्यांमध्ये एकी झाली असून पुढचे तीन दिवस आंदोलन थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढिल काम करणार असल्याचे म्हटले आहे. आंदोलकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.