Download App

शिंदे-फडणवीस सरकारला आमदार संजय गायकवाडांकडून घरचा आहेर

बुलढाणा : अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सहा महिने उलटूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळं विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्यानं टीका केली जातेय. आता शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर परखड भाष्य केलंय. ते म्हणाले की, आम्ही कुणीही मंत्रीपदासाठी इच्छुक नाही पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही. सहा महिने निघून गेले आहेत, अनेक लोक मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले आहेत. आम्ही फडणवीस व शिंदे साहेबांना विनंती करतो की लवकर मंत्रिपदाचा विस्तार करावा.

आमदार गायकवाड म्हणाले की, हो बच्चू कडू यांचं बरोबर आहे, अनेकजण मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत, मंत्रिपदाचा विस्तार झाल्यास राज्यातील कामं जलद गतीनं होतील. लवकर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आम्ही आग्रह करू, असेही गायकवाड म्हणाले. संजय राऊत यांच स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, हे दोन वर्षे काय 2024 नंतर 2029 पर्यंत आम्हीच सरकारमध्ये राहू आणि त्यानंतर ही आम्हीच राहू, एकनाथ शिंदेसुद्धा असतील, असा विश्वास देखील आमदार गायकवाड यांनी व्यक्त केलाय.

खासदार संजय राऊत यांच्यावर आमदार गायकवाड यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशभरात फिरून पाहावं की भाजपा हा एक मोठा समुद्र आहे आणि भाजपा शिवसेना अशी युती आहे , संजय राऊत यांनी तर शिवसेना डबक्यापेक्षा बेकार केलीय, भाजप आणि आम्ही महासमुद्र आहोत, हे सगळ्या देशाला माहीत आहे, अशा प्रकारे जोरदार टीका संजय राऊतांवर केलीय.

संजय राऊत यांच्या डीएनए चेक करण्याच्या मागणीवर गायकवाड म्हणाले की, ‘खरंय आमचा डीएनए चेक केला तर नक्कीच बाळासाहेबांचे विचारच त्यातून बाहेर पडतील. मात्र यांचा डीएनए चेक केला तर काय बाहेर पडेल? हे कोणत्या विचारांनी तिकडे गेले? जे परिवर्तन व्हायचं होतं ते सहा महिन्यापूर्वीच झालं आहे, आता खरं परिवर्तन त्यांचं होणं बाकी आहे की त्यांच्या डोक्यात बाळासाहेबांचे विचार जाणं आणि परिवर्तन होणं गरजेचं आहे.

Tags

follow us