मुंबई : एअरटेल कंपनीचा कामगार सागर मांढरे याला जबर मारहाण केल्याप्रकरणी उच्चपदस्थ IAS अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाऊ देवेश मित्तर यांच्याविरोधात रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित कामगाराने आपल्याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असा आरोप करत मित्तल बंधूंनीही मांढरेविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणात मित्तल यांना अटक व्हावी अशी मागणी सोशल मिडीयावर जोर धरु लागली आहे. (case has been registered at the Rabale police station against high-ranking IAS officer Aman Mittal and his brother Devesh Mittar)
सागर मांढरे याने हे संपूर्ण प्रकरण त्याच्या फेसबुकवरती शेअर केले आहे. तसेच मनसेनेही त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन ही पोस्ट शेअर करत अमन मित्तल आणि त्यांच्या भावाला अटक व्हावी अशी मागणी केली आहे. सागर मांढरे हा मुळचा पाचगणीचा असून तो काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता. 2022 मध्ये सागर Airtel मध्ये इंजिनिअर म्हणून रुजू झाला.
या प्रकरणाबाबत माहिती देताना सागर म्हणाला, 30/12/2023 रोजी मी ‘Wifi Router Installation’ साठी घणसोली मध्ये व्यंकटेशश्वर बिल्डिंगमध्ये गेलो होतो. त्याच ठिकाणी एका ग्राहकाची इंटरनेटबद्दल मला तक्रार आली ती पाहण्यासाठी गेलो होतो. तो ग्राहक IAS अधिकारी होता. त्याचा सोबत त्याचा घरामध्ये त्याचा भाऊ देखील होता, मी तपासणी केली असता इंटरनेट सुरळीत चालू असल्याची खात्री झाली परंतु IAS अधिकारी याला बेडरूम मध्ये रेंज मिळत नसल्याचे त्याने मला सांगितले. मी त्याची देखील पाहणी केली, त्याला बेडरूम मध्ये त्याला रेंज नव्हती मिळत. त्यावर मी त्याला सांगितले “तुमचे 4 BHK घर आहे आणि हॉलमध्ये राऊटर लावल्याने त्याची रेंज बेडरूम पर्यंत मिळण शक्य नाही.”
त्यावर तो भडकला आणि “मी एवढे पैसे भरले आहेत मला बेडरूम मध्ये रेंज आलीच पाहिजे” असं तो बोलू लागला. त्यावर मी त्याला wifi solution बद्दल सांगितले; परंतु त्यावर तो अजून भडकला आणि मला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही ऐकलं नाही आणि माझा अंगावर धावून येऊ लागला. मी त्याला अडवण्यासाठी माझे हात पुढे केले, त्यावर त्या IAS अधिकारी (अमन मित्तल) आणि त्याचा भाऊ (देवेश मित्तल) यांनी घरात दरवाजा बंद करून मला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि खाली तैनात असणाऱ्या शिपाई कामगारांना त्याने कॉल करून बोलावून घेतले.
ते 04 जण लोखंडी पाईप, PVC पाईप आणि लाकडी दंडुके घेऊन वर आले काहीही विचार न करता त्यांनी देखील मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या नंतर त्यानेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. मला पोलीस तेथून घेऊन जात असताना त्यातील एकाने पुन्हा दोन वेळा माझा कानशिलात लगावली आणि रबाळे पोलीस स्टेशनला घेऊन त्या अमन मित्तल च्याच गाडीतून घेऊन गेले. माझा अंगावरील घाव बघितल्यावर पोलीस मला घेऊन ऐरोली येथे NMMC हॉस्पिटल मध्ये गेले.
नंतर पोलीस स्टेशनला आल्यावर प्रथम माझ्यावर FIR दाखल केली. माझी तक्रार पोलीस घेत नव्हते माझे अनेक सहकारी आणि मित्र रबाळे पोलीस चौकी बाहेर उभे होते अनेक जणांना संपर्क केल्यावर सकाळी 03 वाजता त्यांनी माझी तक्रार नोंदवली. पोलिसावर सुध्दा त्याने वरून दबाव आणल्याचे मला जाणवले आज या घटनेला आठवडा झाला तरी देखील गुन्हेगारांवर अजून कोणतीही कारवाई झाली नाही, असे सागर मांढरेने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमन मित्तल यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत सांगितले की, त्यांनी 5 हजार 232 रुपयांना वायफाय कनेक्शन बसवले होते. पण, ते चालत नव्हता. त्यानंतर त्यांनी पुन्हा इंजिनिअरला फोन केला, सागर मांढरे याने कनेक्शन ठीक असल्याचे सांगितले. यानंतर त्याने अमन मित्तल यांना शिवीगाळ करत त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. एफआयआरनुसार सागर मांढरेने मशीननेही हल्ला केला. यानंतर मित्तल यांनी पोलिसांना बोलावले.
अमन मित्तल हे 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे नवी मुंबईतील घणसोली येथे निवासस्थान आहे. यापूर्वी त्यांनी लातूरचे महापालिका आयुक्त, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.