Download App

CM शिंदेंचे नाराज आमदारांना 5 मेसेज; ‘वर्षा’वरील बैठकीत काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदेंच्या शिवसेना आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. शिंदेंच्या राजीनाम्याची अफवा, बंडातील नैतिकता, अजितदादांवरील निधीचे आरोप, मंत्रिपदाची घटलेली संख्या आणि मतदारसंघांची चिंता असे अनेक प्रश्न अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदेंच्या शिवसेना आमदारांच्या पुढे उभे राहिले आहेत. या सगळ्या नाराजीची मंगळवारी (4 जुलै) शिवसेना आमदारांनी आणि मंत्र्यांनी मंत्रालयातच शिंदे यांना कल्पना दिली, त्यांच्याकडे गाऱ्हाणी मांडली. “आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे”, असं म्हणतं एक बैठक घेण्याची मागणी केली. (Cm Eknath Shinde give message to unhappy Shivsena MLA in meeting held on varsha bungalow)

अखेरीस मंगळवारी रात्रीच नागपूर दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री शिंदे मुंबईत परतले. यानंतर बुधवारी (5 जुलै) दिवसभराची काम संपल्यानंतर त्यांनी रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी सर्व आमदारांशी चर्चा केली. या बैठकीत आमदारांनी पुन्हा एकदा आपल्यापुढे आता काय काय अडचणी आहेत? राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने काय काय प्रश्न उद्भवणार आहेत? याची कल्पना शिंदे यांना दिली. आमदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व आमदारांना 5 मेसेज दिले. तसंच कोणतीही चिंता न करण्याबद्दल आमदारांना आवाहन केलं, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

वर्षावरील बैठकीत काय काय घडलं?

2024 पर्यंत आपणचं मुख्यमंत्री :

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अपात्रतेच्या निकालानंतर शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बसवलं जाईल, अशा चर्चा मागील 3 दिवसांपासून सुरु आहेत. त्याबाबच्या अफवांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी खंडन केलं. ते म्हणाले, राजीनाम्याच्या बातम्या निरर्थक आहेत. 2024 पर्यंत मुख्यमंत्री बदलणार नाही. तुम्ही निश्चित राहा. भाजपने आपल्याला 2024 पर्यंत तेच मुख्यमंत्री राहितील असं आश्वासन दिलं असल्याचं शिंदे यांनी आमदारांना आश्वस्त केलं.

अजित पवारांच्या निधीबाबत कोणतीही अडचण येणार नाही :

शिंदेंच्या आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बंडाचं कारण सांगताना अजित पवार यांनी निधी रोखून ठेवल्याचा आरोप केला होता. मात्र आता अजित पवारच शिंदेंच्या सरकारमध्ये आले असून त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद जाण्याची शक्यता जास्त आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, अजित पवार यांना आता ते निधीबाबत निर्देश देऊ शकतात. निधी रोखण्यापासून किंवा न देण्यापासून ते त्यांना परावृत्त करतील. आपण आता मुख्यमंत्री असल्याने आपल्याकडे याबाबतचे अधिकार आहेत. त्यामुळे आमदारांच्या निधीच्या मागण्या पूर्ण होतील. त्यांना कसलीही अडचण येणार नाही.

आपल्या 50 च्या 50 जागा निवडून येणार :

राष्ट्रवादीच्या येण्याने आपले मतदारसंघ अडचणीत आले आहेत. तिथली राजकीय समीकरण बदलली आहेत. अशी चिंता आमदारांनी शिंदेकडे बोलून दाखविली. मतदारसंघांच्या या चिंतेवरही शिंदे यांनी आमदारांना आश्वस्त केलं. आपल्या सर्व 50 जागा निवडून येणार आहेत. याशिवाय आणखी जागा निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.एकाचाही मतदारसंघ जाणार नाही, किंवा तिकीट कापले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना दिलं.

आता जे घडलं त्याची तुम्ही चिंता करु नका, राजकीय तडजोड म्हणून पहा :

राष्ट्रवादीच्या सरकारमधील एन्ट्रीची तुम्ही चिंता करु नका. या गोष्टीकडे राजकीय तडजोड म्हणून पाहिला पाहिजे. तुम्ही आपल्या पक्ष बांधणीवर आणि पुढील निवडणुका जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा संदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार आणि मंत्र्यांना दिला.

मंत्रिपदंही मिळणार :

राष्ट्रवादीच्या येण्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या रिक्त जागांची संख्या कमी झाली आहे. आता केवळ 14 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात राष्ट्रवादीतील आणखी काही आमदारांना सामवून घेतलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मंत्रिपदाचा आकडा घटल्याची तक्रार आमदारांनी शिंदेंना केली. यावर मंत्रिपदही दिली जाणार आहेत, असं आश्वासन शिंदेंनी मंत्र्यांना दिलं. मात्र ती कशी आणि कधी याबाबत त्यांनी मौन पाळलं होतं.

दरम्यान, यावेळी मंत्रिपद मिळण्यासाठी शिवसेनेचे आमदार एकमेकांमध्ये भिडले असल्याचं सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, संजय राठोड यांची मंत्रिपद काढून घेऊन आम्हाला मंत्री करावे अशी मागणी संजय शिरसाट आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Tags

follow us