Download App

प्रार्थना स्थळ अन् मशिदीवरील भोंग्यावर कारवाई होणार; मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीसाठीच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा

  • Written By: Last Updated:

CM Fadnavis on loudspeakers : महाराष्ट्रातील विविध भागातील मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा विविद राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता. (Fadnavis ) मनसे प्रमुख राज ठाकरेही त्यावर बऱ्याचदा आक्रमक झाले होते. आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्याकडं वळले आहेत. त्यांनी याबाबत विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भूमिका मांडली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थना स्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, हा मुद्दा भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेद्वारा मांडला होता. उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रकारे भोंग्यावर कारवाई केली आहे, त्याप्रमाणे राज्य सरकारही कारवाई करणार का? असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं.

तर मशिदींवरून लाऊडस्पीकर उतरवणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. सकाळी ६ ते रात्री १० वाजण्याच्या कालावधीत दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४४ डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे, अशी सध्या कायद्याची तरतूद आहे.

यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीसाठीच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी. ज्याठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल, त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. तसंच, भोंग्यांची जप्ती केली जाईल. तसंच, या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही? हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल.

पोलीस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही? याची तपासणी केली पाहिजे. भोंग्याचे डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रक मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे, असही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

follow us

संबंधित बातम्या