Vijay Wadettiwar Slams Sharad Pawar & Supriya Sule : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकावर भाजपप्रणीत एनडीएला साथ देण्याच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवार यांनी संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचारांचा पुरस्कार करण्यात घालवले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या नेत्याकडून जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना साथ देण्याची भूमिका घेतली जाईल, असे कधीच वाटले नव्हते. मात्र, पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचाच राहिला आहे, अशी जहरी टीका वडेट्टीवार यांनी केली.
‘सत्तेशिवाय जगणं या पक्षाला मान्य नाही’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना सत्तेसाठीच झाली आहे. सत्तेशिवाय जगणे या पक्षाला मान्य नाही. कोणताही ठोस वैचारिक आधार न ठेवता केवळ सत्तेच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. ‘सत्तेसाठी जगायचं आणि सत्ता घेऊन मरायचं, एवढंच यांच्या डोक्यात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पवारांवर निशाणा साधला.
‘बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात’
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या संभाव्य भूमिकेवरून वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. भाजपला साथ देण्याचा निर्णय दोघांनी मिळून घरातच घेतला आहे. पक्ष फुटण्याची भीती दाखवून अशा प्रकारचा निर्णय घेतला जात असेल, तर त्यामागील कारणांवरही प्रश्न उपस्थित होतात, असे ते म्हणाले.
सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरही टोला
सुप्रिया सुळे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी 10 आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रिपदाची मागणी करणे हास्यास्पद असल्याचे म्हटले. भाजपने 60 आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले नव्हते. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार असेल, तर तो त्यांचा आनंदाचा विषय आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
‘डिलिमिटेशनमुळे लोकशाहीसमोर मोठे संकट’
डिलिमिटेशन विधेयकाच्या संभाव्य परिणामांबाबतही वडेट्टीवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, या विधेयकामुळे देशातील लोकशाही आणि संविधानासमोर मोठे संकट निर्माण होऊ शकते. भविष्यात देशात हुकूमशाहीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांना आम्ही राज्यसभेवर पाठवताना त्यांच्या माध्यमातून संसदेत फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार जिवंत राहावा, ही अपेक्षा होती. मात्र, आता त्याच विचारांना संपवण्याचे काम पवार करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
डिलिमिटेशन विधेयकावरून काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. भाजपला मिळणाऱ्या संभाव्य पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात पवारांच्या भूमिकेवर काँग्रेसकडून आणखी आक्रमक प्रतिक्रिया येतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
