पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले आहे. राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे. कार्यालयातील राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या आरोपांवर आतापर्यंत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला होता. दरम्यान, मसुरीला जाण्यापूर्वी पहिल्यांदाच खेडकर यांनी त्यांची सविस्तर बाजू मांडली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रातून एक सविस्तर खुलासाच त्यांनी केला आहे.
पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच वादात सापडल्या होत्या. त्यांनी अवास्तव मागण्या केल्याचा अहवाल पाठवून खेडकर यांची बदली करावी अशी मागणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यावर खेडकर यांच्याकडूनही खुलासा मागविण्यात आला होता.(Controversial IAS officer Pooja Khedkar has presented her side in detail for the first time)
आता सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रातून त्यांनी हा खुलासा सादर केला आहे. यात खेडकर यांनी दिवसे यांच्यावर अवमानकारक वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. मी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी दालन बळकावले नसून त्यांनीच माझी व्यवस्था त्या दालनात केली होती, असा दावाही खेडकर यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीने माझी उद्दाम अधिकारी म्हणून जनमानसात प्रतिमा निर्माण झाल्याने मला मानसिक त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाची तक्रारही दाखल केली आहे.
रुजू होण्याचा दिवशी जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर त्यांना माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबाबत विचारणा केली. त्यावर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था नसते असे सांगितले. यशदाच्या संचालकांकडे प्रशिक्षणाचे रिपोर्टिंग करायचे असल्याने ही बाब मी त्यांच्या कानावर घातली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून बसण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला बसण्यासाठी दोन जागा दाखवल्या. त्यापैकी एका दालनाला जोडून वॉशरूम नसल्याने मी ते नाकारले. दुसरी जागा चौथ्या मजल्यावरील खणीकर्म विभागाच्या स्टोअरमध्ये असलेली एक खोली दाखवली. ती मी मान्य केली.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे सांगितले. त्याचवेळी माझे वडील माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते. मी त्यांना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांशी ओळख करून देण्यासाठी त्यांच्याकडे घेऊन गेले. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची बसण्याची व्यवस्था झाली का? अशी विचारणा केली. त्यावर मी चौथ्या मजल्यावरील स्टोअरमध्ये असलेल्या रूममध्ये व्यवस्था झाल्याचे सांगितले. त्यावर तुम्ही आयएएस अधिकारी आहात. तुम्ही माझे खासगी दालन वापरा असे सांगून शिपायाला सर्व व्यवस्था करण्यास सांगितले. बाहेर बोर्डही लावा असेही संबंधितांना सांगितले.
दुसऱ्या दिवशी माझे प्रशिक्षण आयुक्त कार्यालयात असल्याने मी त्या ठिकाणी गेले. त्याच दिवशी जिल्हाधिकारी तीन ते चार दिवसांच्या रजेनंतर परतले होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी दालन वापरत असल्याचा राग त्यांना आला असावा. त्यांनी तहसीलदाराला बोलून टेबल आणि खुर्च्या बाहेर काढण्यास सांगितले. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकून घेतले नाही. मी जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी दालन जबरदस्तीने घेतले असेही म्हणाले. मी त्यांची माफी मागितल्यानंतरही त्यांनी माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबाबत कसा उद्दामपणा केला याबाबत तक्रार केली. त्यामुळे हे सर्व गैरसमजातून झाले असून हा मुद्दा मोठा केल्याने माझी प्रतिमा मलीन झाली आहे, असा खुलासा त्यांनी या पत्रातून केला आहे.