राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP ) आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी कापसाच्या धोरणावरुन केंद्र सरकार व राज्य सरकारवर टीका केली आहे. कापसाचे भाव कमी झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, त्याला तात्काळ राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.
कापसाचे भाव कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत आला आहे. मराठवाडा, विदर्भ यासह ज्या भागात कापसाचे पीक घेतले जाते, त्या सर्व भागातील शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय झाली आहे. मागच्या वर्षी कापसाला 12 ते 13 हजार रुपये भाव मिळाला होता. यावर्षी मात्र 9 ते साडे नऊ हजार रुपये भाव कापसाला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे घडले आहे, अशी टीका देशमुख यांनी केली आहे.
(विधानभवनाच्या पायर्यांवर राडा, विरोधकांचं कांद्याच्या माळा घालून आंदोलन…)
यावर्षी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर कापसाची आयात केली. 12 लाख गाठी कापसाची आयात केल्याने कापसाचे भाव पडले. तसेच ज्याप्रमाणावर कापसाची निर्यात व्हायला पाहिजे ती निर्यात देखील झाली नाही. मागच्यावर्षी 43 लाख गाठी कापसाची निर्यात परदेशात झाली होती. यावर्षी फक्त 30 लाख गाठी कापसाची निर्यात झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 13 लाख गाठी कापसाची निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याबाबतीत धोरण निश्चित करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान आज राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधी पक्षाने आज विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. कांद्याचे भाव पडल्यामुळे विरोधकांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालत हे आंदोलन केले आहे.