नागपूर : बागेश्वरधामचे (Bageshwardham) धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) हे सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात आणि अंधश्रद्धा पसरवीत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Superstition Eradication Committee) संस्थापक प्रा. श्याम मानव (shyam manav) यांनी केला होता. यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. वारंवार येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील बागेश्वरधामचे गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज हे सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात. स्त्रियांच्या चारित्र्याचे हनन करतात आणि आस्थेला अंधश्रद्धेत बुडवित असल्याचा आरोप करत, आम्ही नव्हे तर हे महाराजच सनातन हिंदू धर्माचे नुकसान करीत असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता.
तसेच धीरेंद्र कृष्ण महाराज नागपुरात असतानाच अंनिसने त्यांना दिव्य शक्ती सिद्ध करून दाखवा आणि तीस लाख रुपये मिळवा असे आव्हान दिले होते. यावरुन वातावरण तापले होते.
यानंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन येत आहेत. तुमचा दाभोळकर करू, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली आहे. समितीने याबाबत नागपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.