मुंबई : राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मंत्र्यांचे पक्षसंघटनेकडे होत असलेले दुर्लक्ष आणि नेमून दिलेल्या जिल्ह्यांकडे फिरवलेली पाठ यामुळे ही नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी आता सर्व मंत्र्यांचे प्रगती पुस्तक मागविण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar along with MPs Praful Patel and Sunil Tatkare are upset with eight NCP ministers)
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून राज्यात संघटनेला बळ देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या मजबूतीसाठी मंत्र्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र जबाबदारी देऊन महिना उलटला तरी नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री गेलेले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत मंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा सूर या बैठकीत उमटला.
या पार्श्वभूमीवर कोणत्या मंत्र्याने आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात, कुठे कुठे भेटी दिल्या, किती कार्यकर्ता मेळावे घेतले, पक्षाच्या किती शिबिरांना हजेरी लावली आणि किती पदाधिकऱ्यांच्या बैठका घेतल्या, किती जणांचे पक्षप्रवेश करवून घेतले, बडा नेता पक्षात आणण्यात यश आले आहे का? अशा सर्व कामकाजाचा अहवाल मंत्र्यांकडून मागविण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांची खात्याची जबाबदारी आणि पक्षसंघटनेतील जबाबदारी पार पाडताना दमछाक होताना दिसणार आहे.
अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर विदर्भातली जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती जिल्ह्यांत राष्ट्रवादीच्या वाढीसाठी प्रयत्न करावं, लागणार आहे. तसेच मंत्री छगन भुजबळांवर नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरची, त्याचप्रमाणे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदूर्ग, अहमदनगरची जबाबदारी सोपवली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, तर संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, तसेच अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला म्हणून सत्तेत मंत्रिपद भूषविणाऱ्या आमदार आदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.