Download App

Devendra Fadanvis ठाकरेंमुळे कोकणचा विकास रखडला…!

सिंधुदुर्ग : खरं म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या नेतृत्वात अडीच वर्ष जे सरकार होतं. कोकणच्या विकासासाठी अडीच वर्षांमध्ये त्यांना एक गोष्ट करता आली नाही. फक्त थापा मारायचे काम त्यांनी केले. या ठिकाणी दोन चक्रीवादळ आली त्या चक्रीवादळामध्ये साधे १५०-२०० कोटी रुपये द्यायचे होते. तेही मदतीचे पैसे देखील दिले नाही. एक फुटकी कवडी ठाकरे सरकारने कोकणवासियांना दिली नाही. उलट नाणार, जैतापूर यांसारख्या प्रत्येक येणाऱ्या नवीन प्रकल्पाला फक्त विरोध करुन कोकणचा विकास रखडवला, अशी खरमरीत टिका उद्धव ठाकरे यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.

सिंधुदुर्ग येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे, नितेश राणे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चिपी-परुळे विमानतळ या ठिकाणी झालं. त्याचं श्रेय खरंच कोणाला द्यायचं असेल तर ते नारायण राणे यांना दिले पाहिजे. राणे यांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. तेव्हाच काय अडचण होत्या त्या अडचणी आपण दूर केल्या. कामे राणे यांनी पूर्ण मार्गी लावली आहेत. नारायण राणे आणि सुरेश प्रभू आपण सगळ्यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले.

मात्र, काही लोकांना दोन-दोन वेळा उद्घाटन करण्याची देखील हौस असते. त्यांनी त्याच्या करता काहीच केलं नाही. एक वीट देखील रचण्याकरता मदत केली नाही. मात्र, चिपी-परुळे विमानतळ या ठिकाणी आम्ही केले. मी स्वतः विमान घेऊन आलो होतो. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या नवीन सरकारने नवीन काहीही केले नाही. पण केवळ सरकार नवीन आलं म्हणून नवीन उद्घाटन आणि म्हणून राज्याने पुन्हा एकदा उद्घाटन बघितलं, अशी शेलक्या शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांचा सुफडा साफ केला. भारतीय जनता पक्षाची ताकद काय असते ती तुम्ही या सिंधुदुर्गात दाखवली. जिल्हा परिषदेत दाखवलं. विरोधकांचे काही म्हणता काही शिल्लक ठेवलं नाही. निलेश राणे जे म्हणाले ते मात्र खरं आहे. आता याच्यामधली जी कमतरता आहे. ती पुढच्या वर्षी भरून काढू आणि येथील आमदार आणि खासदार हाही भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच येणार आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

Tags

follow us