Dilip Walse Patil : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आज सर्वच आमदार, मंत्री आपल्या मतदारसंघात पोहोचले आहेत. मंत्र्यांचे त्यांच्या मतदारसंघात व जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात स्वागत होत असून आमदारांचाही नागरी सत्कार व सन्मान केला जात आहे. (Dilip Walse Patil) मात्र, ज्या आमदारांना व बड्या नेत्यांना मंत्रिपदाला हुलकावणी दिली, त्या नेत्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गोगावलेंचा रायगडच्या पालकमंत्रिपदावरचा दावा कायम, तटकरेंशी पुन्हा संघर्ष?
महायुतीच्या राज्य सरकारमध्ये यंदा मुख्यमंत्र्यांसह एकूण 42 मंत्र्याचा शपथविधी पार पडला असून 39 मंत्र्यांनी नागपुरात शपथ घेतली. त्यानंतर, ते पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात पोहोचत आहेत. मात्र, अनेक दिग्गजांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नेते व कार्यकर्ते दोघेही नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र, माजी गृहमंत्री राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदावर भाष्य करणाऱ्या कार्यकर्त्याचेच कान टोचले आहेत.
मतदारसंघातील कार्यक्रमात बोलताना, साहेब मंत्रीपद पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होत. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांनाच टोमणा हाणला. विधानसभेला 1500 मतांनी विजयी झालोय, म्हणून मला मंत्रीपद द्या, अशी मागणी पक्षाध्यक्षांकडे करायची का? असा खोचक टोमणा वळसे पाटलांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांला लगावला. आंबेगाव विधानसभेतून वळसेंना शरद पवार गटाचे देवदत्त निकमांनी कडवी झुंज दिली. या निसटत्या विजयानंतर वळसेंनी आज आभार मेळावा आयोजित केला होता.
दरम्यानच्या काळात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वळसेंची वर्णी लागली नाही. त्यामुळे या आभार मेळाव्यात एका अतिउत्साही कार्यकर्त्याने साहेब आपल्याला मंत्रीपद हवं, असा आग्रह धरला. तेंव्हा वळसेंनी सरसकट सर्वांना चिमटा काढला. त्यामुळे, दिलीप वळसे पाटील हेही मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नसल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून सर्वच मंत्र्यांना आता कार्यभार देण्यात आला आहे. अपेक्षेप्रमाणे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिले आहे. तर, अर्थ व वित्त आणि नियोजन विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.
राज्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेल्या आणि मंत्रिपदासाठी गत महायुती सरकारपासून इच्छुक असलेल्या मंत्र्यांनाही महत्त्वाचे खातेवाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार, शिवसेनेच्या मंत्री भरत गोगावले, संजय शिरसाट, संजय राठोड तर भाजपमध्ये नितेश राणे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही खातेवाटप जाहीर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नरहरी झिरवाळ यांनाही वजनदार खातं मिळालं आहे.