कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणं बरोबर असल्याची मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक असून धर्मवीर नसल्याचं म्हणाले. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.
त्यांनंतर विरोधकांकडून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना इतिहास संशोधकांनी यावर आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले, संभाजी महाराजांनी आपलं बलिदान धर्मासाठी दिलंय की, स्वराज्यासाठी दिलंय, यासंदर्भात इतिहासाची साधने अभ्यासल्यानंतर त्यांना स्वराज्यरक्षक असं म्हणंण बरोबर असल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलंय.
सावंत म्हणतात, ज्यावेळी संभाजीराजांना बहादुरगडावर औरंगजेबाच्या सैन्यांनी समोर कैद करुन आणलं तेव्हा महाराष्ट्राचा छावा छत्रपती संभाजी महाराजांनी तसूभरही मान झुकवली नसून त्यांनी औरंगजेबाला ताजीम दिली नसल्याची नोंद इतिहासामध्ये आढळून येत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
औरंगजेबाने संभाजीराजांसमोर एकूण तीन अटी ठेवल्या होत्या. त्यातील पहिली म्हणजे तुला माझ्याकडचे कोण कोण फितूर झाले ते सांग, दुसरी म्हणजे तुझा खजिना कुठे ठेवला आहे तो सांग..आणि शेवटची तुझे सगळे गडकोट माझ्या स्वाधीन कर, अशा अटी औरंजेबाने संभाजीराजांसमोर ठेवल्या. मात्र यातील एकही अट मान्य नसल्याचं संभाजीराजांनी सांगितल्यानंतर त्यांचे डोळे काढण्यात आले होते.
इतिहासाच्या संदर्भ साधनांमध्ये कुठेही शंभुराजांनी इस्लाम धर्म स्वीकारावा, मग तुझी मी मुक्तता करतो असा औरंगजेब म्हंटला, अशी नोंद नाही. ही घटना घडल्यानंतर दीडशे वर्षानंतर मल्हार रामराव चिटणीस नावाच्या एका बखरकाराने शंभूराजांचे चरित्र लिहिलं. हा बखरकार म्हणजे ज्या बाळाजीं आवजीना संभाजी महाराजांनी अण्णाजीपंताबरोबर हत्तीच्या पायी देऊन शिक्षा दिलेली होती, त्याचा हा चिटणीस वारस असल्याचंही सावंत यांनी सांगितलं आहे.
तसेच जर तू तुझी मुलगी जर मला दिलीस तर मी बाटतो म्हणजे मी इस्लाम धर्म स्वीकारतो, असा मनघडन इतिहास चिटणीसाने लिहला आणि यातूनच पुढे संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून केली असल्याचा इतिहास मांडला असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, संभाजी महाराजांच्या चरित्राचा उपयोग आपल्या विचारधारेला करण्यासाठी संभाजी महाराजांची धर्मवीर अशी प्रतिमा निर्माण करण्याची सुरुवात सध्या काही लोकांकडून सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल तर आपण संभाजी महाराजांना एका संकुचित चौकटीमध्ये न बांधता इतिहासाचा अभ्यास करुन संदर्भ साधनांचा आदर राखून जे सत्य आहे ते वारंवार सांगितलं पाहिजे ही माझी भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.