Download App

Dnyaneshwar Mhatre : महाविकास आघाडीला धक्का देणारे… म्हात्रे कोण आहेत ?

मुंबई : कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील हे महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत उमेदवार असतानाही त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. तर भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) पाठिंबा दिला होता.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकांची मतमोजणीला गुरुवारी सकाळपासून सुरुवात झाली. प्रत्यक्ष निकाल येण्यास दुपारी १ नंतर सुरुवात झाली. त्यात पहिला विजय हा भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रुपाने झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्या पसंतीची जवळपास २० हजार मते मिळवल्याने त्यांचा विजय निश्चित झाला. म्हात्रे यांच्या रुपाने भाजप आणि शिंदे गटाचा पहिला विजय झाला असून या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांनी धक्का दिला.

राज्यात एकूण पाच जागांवर झालेल्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. पहिला निकाल हा कोकण शिक्षक मतदारसंघातून आला आहे. म्हात्रे यांनी प्रथमपासून पूर्ण तयारीने प्रचारात सहभाग घेतला होता. भाजपच्या म्हात्रे यांना शिंदे गटानेही पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे शेकापचे बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या मदत केली. मात्र, बाळाराम पाटील यांचा या मतदार संघात धक्कादायकरित्या पराभव स्वीकारावा लागला आहे.

मूळचे बदलापूर येथील ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक आहे. म्हात्रे यांना शिवसेनेची पार्श्वभूमी अअसून त्यांचे बंधू वामन म्हात्रे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख देखील आहेत. वामन म्हात्रे यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकही लढवली होती. तर ज्ञानेश्वर म्हात्रे हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत देखील आहेत. तसेच अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदिर, एम. के. पाटील विद्यामंदिर या शाळांमध्ये ते संचालक म्हणूनही काम पाहत आहेत.

Tags

follow us