मराठेशाहीचा इतिहासकार हरपला; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला असून ते 85 वर्षांचे होते.

Untitled Design 91

Untitled Design 91

Dr. Jayasingrao Pawar passes away : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्राला मोठा धक्का देणारी दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले असून ते 85 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठेशाहीचा इतिहासकार हरपला, अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे त्यांचा जन्म झाला. डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इतिहास संशोधनाची वाटचाल सुरू केली. शिवाजी विद्यापीठ येथून त्यांनी एम. ए. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर उद्यापन करत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण केली.

डॉ. पवार यांनी इतिहास क्षेत्रात मोठे योगदान दिले. महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा इतिहास आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर त्यांनी 25 पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले. एम. ए. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 20 क्रमिक पुस्तके तयार केली, तर विविध परिषदांमध्ये त्यांच्या 45 हुन अधिक शोधनिबंध तयार झाले.

ते आखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक सदस्य होते आणि नंतर अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले. 1992 मध्ये त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची स्थापना करून इतिहास संशोधन आणि समाजप्रबोधनासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली 1200 पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ प्रकाशित झाला, ज्याचे विविध भारतीय तसेच परकीय भाषांमध्ये अनुवाद करण्यात आले.

शाहू चरित्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांच्या ग्रंथांचे प्रकाशन झाले होते. इतिहास संशोधन, लेखन आणि समाजप्रबोधन या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य मानले जाते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Exit mobile version