Drugs worth Rs 6,000 crore seized in DRI operation : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रग्स कारवाईने खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे पुण्याच्या DRI म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागाने एनडीपीएस कायद्यानुसार मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत तब्बल 6 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई इतकी गोपनीय होती की, सतत जिल्हा पोलीस आणि कराड पोलीस प्रशासनाला देखील याची पूर्वकल्पना नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाचपुतेवाडी येथील एका संशयित शेडवर डीआरआयच्या विशेष पथकाने छापा टाकत ही कारवाई केली. या छापेमारीत तीन वरिष्ठ आयपीएस अधिकारी सहभागी होते, अशी माहिती समोर येत आहे. डीआरआयने संबंधित शेड पूर्णपणे सील केला असून, याठिकाणी अंमली पदार्थांची निर्निती केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात एक मोठं नाव समोर आलं आहे. महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती समोर येत असून, त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.
मोदी सरकारकडून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार
या कारवाईनंतर सातारा जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं कोणत्या प्रकारचे अंमली पदार्थ याठिकाणी तयार केले जात होते?, त्याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का?, त्याचप्रमाणे या रॅकेटमध्ये आणखी किती आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर येऊ शकलेली नाही. महत्वाचं म्हणजे, एका महिन्यात सातारा जिल्ह्यातील ही दुसरी मोठी ड्रग्स कारवाई आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी कराड तालुक्यातील सावरी गावात छापेमारी करत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले होते. त्यामुळे सातारा जिल्हा ड्रग्स नेटवर्कचं केंद्र बनतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डीआरआय विभागाकडून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील काही तासांत किंवा दिवसांत अधिकृत पत्रकार परिषदेतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या कारवाईबाबत अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
