मुंबई : आधीच पावसाला उशीरा झालेली सुरुवात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी आता सरकारी पातळीवरही तयारी सुरू झाली आहे. राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन कृषी, महसूल आणि इतर संबंधित विभागांनी आराखडा तयार ठेवावा, चारा, वैरण आणि पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते.
राज्यात यंदा सरासरीच्या 89 टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच काळात सरासरीच्या 122.8 टक्के पाऊस झाला होता. यातही विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया तर मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. (Due to lack of rains, the state has been under the threat of drought)
20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या जिल्ह्यांमधील पिके सुकू लागली आहेत. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही, तर या भागामध्ये दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे या भागातील परिस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली. कृषी विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात यंदा 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले 6 जिल्हे आहेत. तर 75 ते 100 टक्के पाऊस झालेले 13 जिल्हे आहेत. 50 ते 75 टक्के पाऊस झालेले 15 आणि 25 ते 50 टक्के पाऊस झालेले 13 तालुके आहेत.
सध्या राज्यातील 329 गावे आणि 1273 वाड्यांमधून 351 टँकर सुरू (Water supply by tanker) आहेत. येत्या काळात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाई (water shortage) आणखी तीव्र होऊन टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने माहिती दिल्याप्रमाणे सध्या राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात 61.90 टक्के पाणी साठा आहे.