कोल्हापूर – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) प्रमुख अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी इंग्रजी भाषा शिकण्याचा सोपा आणि स्वस्त पर्याय विद्यार्थ्यांना सांगितला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात अमित ठाकरे कोल्हापुरातील (Kolhapur) विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांना आलेला अनुभव सोशल मिडियावर शेअर केलाय.
अमित ठाकरे लिहितात, “इंग्रजी भाषा सहजतेने बोलता-लिहिता येत नसल्यामुळे आम्हाला फक्त कॉलेजच्या परीक्षेतच नव्हे, तर करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर निराशेला सामोरं जावं लागत आहे” अशा शब्दांत एका विद्यार्थिनीने कोल्हापूरच्या आमच्या ‘महासंपर्क’ बैठकीत स्वत:च्या भावना व्यक्त केल्या.
एखादी भाषा येत नाही म्हणून आत्मविश्वास ढासळलेल्या तिच्यासारख्या असंख्य तरुण-तरुणींना माझं एकच सांगणं आहे. इंग्रजीच काय, जगातील कोणतीही भाषा अत्यंत आदर्श पद्धतीने शिकण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय तंत्रज्ञानामुळे आता आपल्या मुठीत आला आहे; तो म्हणजे यूट्यूब! मी स्वतः गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबच्या मदतीने स्पॅनिश भाषा शिकतोय!!” असा सल्ला अमित ठाकरे यांनी दिलाय.