Eknath Shinde hands over AB form to Mangesh Chivte : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणेज मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सचिन सानप हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने महायुतीतील अंतर्गत स्पर्धा आणखी वाढली आहे.
दिल्ली दौऱ्यावर असेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत पुणे शिक्षक मतदारसंघांच्य उमेदवारीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मंगेश चिवटे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्या त्यांचा एबी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर महायुतीच्या पातळीवर पुन्हा चर्चा केली जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 7 तारखेला असल्याचे सांगत, त्यापूर्वी महायुतीमध्ये पुन्हा चर्चा होईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली. त्यामुळे सध्या शिवसेनेने मंगेश चिवटे यांना अधिकृत उमेदवारी दिली असली, तरी महायुतीमध्ये अंतिम तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
2022 ला झकमारी केली म्हणून मंत्री झालो, संजय शिरसाटांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
दरम्यान, भाजपकडून कौस्तुभ गावडे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडूनही उमेदवार मैदानात उतरल्याने महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सचिन सानप हेही अर्ज दाखल करणार असल्याने एकाच मतदारसंघासाठी महायुतीतील तीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती एकत्रितपणे कोणत्या उमेदवाराच्या मागे उभी राहणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे विशेष राजकीय महत्त्वाने पाहिले जात आहे. शिवसेनेने त्यांना एबी फॉर्म दिल्याने पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी अंतिम निर्णय महायुतीच्या बैठकीनंतरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत भाजप आणि शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या संपणार असून त्यानंतर 7 तारखेला अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे त्याआधी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा होऊन उमेदवार निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. आता मंगेश चिवटे उद्या अर्ज दाखल करणार असल्याने पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीची ही लढत आणखी रंगतदार होणार आहे.
